सातूचे पीठ हे भाजलेल्या चण्यापासून (हरभऱ्यापासून) तयार केलेले अत्यंत पौष्टिक पीठ आहे. उत्तर भारतात, विशेषतः बिहार-झारखंड भागात सातूला सुपरफूड मानले जाते. महिलांच्या आरोग्यासाठी तर सातूचे पीठ खूपच फायदेशीर ठरते, कारण ते शरीराला पोषण देते, हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते आणि दैनंदिन थकवा कमी करते. महिलांना अनेकदा अशक्तपणा, थकवा, पचनाचे त्रास, हार्मोनल बदल, वजन वाढ किंवा वजन कमी न होणे अशा समस्या भेडसावतात. सातूच्या पिठामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची ताकद वाढते. घर, ऑफिस आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना येणारा थकवा कमी करण्यास सातू उपयुक्त ठरतो.
सातू हे फायबरने समृद्ध असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होतात. अनेक महिलांना मासिक पाळीच्या काळात पचन बिघडण्याचा त्रास होतो, अशा वेळी सातू हलके आणि पचायला सोपे असल्यामुळे आराम देणारे ठरते. तसेच सातू पोटभरीचे असते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हार्मोनल संतुलनासाठीही सातू फायदेशीर मानले जाते. सातूमधील पोषकतत्त्वे शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे अंगावर उष्णता उठणे, चिडचिड, आम्लपित्त यांसारखे त्रास कमी होतात. उन्हाळ्यात महिलांसाठी सातूचे पीठ विशेष लाभदायक ठरते, कारण ते शरीराला थंडावा देणारे ठरते आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सातू उपयुक्त आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे साखर हळूहळू वाढते. त्यामुळे मधुमेहाची शक्यता असलेल्या किंवा साखर नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी सातू योग्य पर्याय ठरतो. तसेच सातूमध्ये लोह आणि इतर खनिजे असल्यामुळे हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यासही मदत होते. त्वचा आणि केसांसाठीही सातू फायदेशीर ठरतो. शरीर आतून स्वच्छ राहिल्यामुळे त्वचा अधिक तेजस्वी दिसते. बद्धकोष्ठता कमी झाल्याने मुरुम, पुरळ यांसारख्या समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते. केस गळणे कमी होऊन केसांना पोषण मिळते.
सातूचे पीठ आहारात समाविष्ट करुन घेण्यासाठी विविध पदार्थ करता येतात. जसे की, सातूचे पौष्टिक लाडू करता येतात. त्यात साखरेऐवजी गूळ वापरा म्हणजे तो बाधत नाही. तसेच सातूचे डोसे करता येतात. अप्पे करता येतात तसेच इतरही पदार्थ करता येतात. सातूचे पीठ ताकात भिजवून किंवा दुधात भिजवून खाता येते. तसे कच्चेही ते चविष्टच लागते. त्यामुळे आहारात हे पीठ नक्की असावे.
