भारतीय खाद्यसंस्कृतीची खासियत म्हणजे साधेपणातही चव. कोणताही भाजी असो विविध प्रकारे करता येते आणि प्रत्येक रेसिपी खासच असते. जसे की बटाटा. बटाट्याची भाजी म्हटलं की ती नुसतही करता येते. वेगवेगळ्या भाज्यांसोबतही छान लागते शिवाय बटाट्याची भाजी विविध प्रकारे करता येते. परतून, शिजवून, वाफवून, अगदी भाजूनही करतात. (Saraswat Style Ambat Batata Recipe: Authentic Tangy Potato Dish You’ll Want to Make Again and Again)अशीच एक मस्त पद्धत म्हणजे आंबट बटाटा. भाजी पण आणि आमटीही. ही रेसिपी करायला अगदीच सोपी आहे. सारस्वतांच्या घरी ही भाजी आवर्जून केली जाते. पाहा कशी करायची.
साहित्य
बटाटा, हिरवी मिरची, ओला नारळ, धणे, कोथिंबीर, पाणी, हिंग, हळद, मीठ, लाल तिखट, काळी मिरी, साखर, मेथी दाणे, चिंच
कृती
१. बटाटे स्वच्छ धुवायचे आणि सोलून घ्यायचे. नंतर बटाट्याचे लांब लांब काप करायचे. जरा जाडसर काप करा. पातळ पाक नको. काप थोडावेळ मीठ पाण्यात ठेवायचे म्हणजे मीठात छान मुरतात. एका वाटीत गरम पाणी घ्यायचे त्यात चिंच भिजत ठेवायची. पाणी गरमच घ्या म्हणजे चिंच लवकर मऊ होते. चिंच मऊ झाल्यावर हाताने कुस्करायची. गाळून घ्या आणि चोथा काढून टाका. चिंचेचा कोळ तयार होतो.
२. कढईत चमचाभर तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात थोडी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात चार मेथीचे दाणे घालायचे. मेथी दाणे कमीच घ्या. म्हणजे कडवट होणार नाही. थोडे हिंग घाला नंतर बटाटा घालायचा, लाल तिखटही घालायचे. बटाटा तिखटावर मस्त परतून घ्यायचा तिखट जळू नये यासाठी थोडे पाणी घालायचे. त्यावर झाकण ठेवायचे आणि बटाटा शिजू द्यायचा. एका मिक्सरच्या भांड्यात ताजे ओले खोबरे घ्यायचे. त्यात चमचाभर धणे घालायचे आणि एक अख्खी हिरवी मिरची घालायची. तिखट आवडत असेल तर जास्त मिरच्या घेऊ शकता. चार काळीमिरीचे दाणे घाला, मस्त वाटून घ्या. वाटण्यासाठी अगदी थोडे पाणी वापरा.
३. बटाटे शिजत आल्यावर त्यात चिंचेचा कोळ घालायचा. चिंचेचे पाणी घालून झाल्यावर त्यात लाल तिखट घाला. तसेच तयार केलेले वाटणही त्यात घाला आणि छान ढवळून घ्या. चमचाभर साखर घाला आणि झाकण ठेवा. छान वाफ काढून घ्या. भाजी एकजीव होऊ द्या. चवीनुसार मीठ घाला. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि जरा पाणी आटू द्या. मस्त रस्सा भाजी तयार होते.
