झटपट कोणता गोड पदार्थ खायचा असेल किंवा करायचा असेल तर मग डोक्यात पहिले खीरीचाच विचार येतो. करायला अगदी सोपी असते. झटपट होते आणि सगळे आवडीने खातात. खीरीचे अनेक प्रकार आहेत. (Sago and banana kheer, an instant sweet dish - the kheer tastes different and the recipe is unique)रव्याची, गव्हाची, शेवयांची आदी अनेक प्रकारच्या खीर केल्या जातात. साबुदाण्याची खीर घरोघरी केली जाते. मात्र एकदा अशी खीर नक्की करुन पाहा. जरा वेगळी रेसिपी.
साहित्य केळी, साबुदाणा, दूध, गूळ/साखर , बदाम, तूप, वेलची पूड, काजू
कृती१. केळी सोलून घ्यायची. केळीचे काप करायचे. गोल लहान काप करुन घ्यायचे. साबुदाणा किमान चार तासांसाठी तरी भिजत घालायचा. रात्रभर भिजवला तर उत्तमच. बदामाचे बारीक तुकडे करायचे. पूड करु नका, फक्त तुकडे करायचे. काजूचेही तुकडे करायचे. दोन तुकडे केले तरी चालेल. वेलचीची पूड करुन घ्यायची. स्वयंपाकघरात तयारच असेल तर उत्तमच.
२. कढईत तूप घ्यायचे. तीन ते चार चमचे तूप घ्यायचे. तुपावर बदामाचे तुकडे परतायचे. तसेच काजूचे तुकडेही परतायचे. दोन्ही छान खमंग परतून झाल्यावर वाटीत काढून ठेवायचे. तुपावर केळीचे काप परतायचे. केळीच्या मस्त सुगंध दरवळायला लागल्यावर ग२स बंद करायचा.
३. खोलगट पातेल्यात दूध तापवायचे. दूध तापत ठेवल्यावर त्यात साबुदाणा घालायचा. साबुदाणा छान फुलू द्यायचा. दूध घट्ट व्हायला लागेल. दूध जरा घट्ट झाल्यावर त्यात साखर किंवा गूळ घाला. झाकून ठेवा आणि एक वाफ काढा. नंतर त्यात गरजेनुसार दूध घालायचे. तसेच केळीचे परतून ठेवलेले काप घालायचे आणि छान ढवळायचे. त्यात वेलची पूड घालायची. थोडे चमचाभर तेल वरतून घालायचे.
४. काजू आणि बदाम खीरीत घालायचे. व्यवस्थित ढवळायचे आणि मग गॅस बंद करायचा. साबुदाणा छान शिजल्यावरच गॅस बंद करायचा. साबुदाणा शिजायला जरा जास्त वेळ लागतो. तो लिबलिबीत होणार नाही याची काळजी घ्यायची. खीर तयार झाल्यावर गरमागरम खा. चपातीशी खाऊ शकता. तसेच पुरीशी मस्त लागेल. नुसती खाण्यासाठी तर अगदीच उत्तम.