चपाती हा पदार्थ अनेक भारतीय घरांमध्ये दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी खाल्ला जातो. परफेक्ट, सॉफ्ट, फुगलेली चपाती खायला प्रत्येकालाच आवडते. प्रत्येक घरांमध्ये चपात्या केल्या जात असल्या तरी चपात्यांची चव आणि टेक्चर प्रत्येकाचे वेगवेगळे असते. (How To Make Chapati From Dough)
काहीजणांच्या चपात्या घडीच्या, कापसारसारख्या मऊ असतात काहीजण फुलके बनवतात तर काहीजणांच्या चपात्या कडक असतात. काहीजणांच्या जाडसर तूप लावलेल्या चपात्या असतात. चपात्या करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तुम्ही चपातीचं पीठ कसं मळता यावर चपातीचे टेक्सचर कसे असेल हे अवलंबून असते. चपातीचं कणीक कसं मळायचं, कणीक मळताना नेमकं किती पाणी घालावं समजून घेऊ. (Roti Chapati Dough Recipe Ideal Water And Wheat Flour Ratio For Roti Dough)
गव्हाची कणीक मळताना पाणी किती घ्यावं?
परफेक्ट पीठ मळण्यासाठी पाण्याचं प्रमाण हे पिठाच्या प्रमाणावर अवलंबून असते. साधारणपणे २ कप गव्हाच्या पिठासाठी १ कप किंवा त्यापेक्षा थोडं कमी पाणी लागतं. म्हणजे पीठ आणि पाण्याचं प्रमाण २:१ इतकं असायला हवं. पण पीठ जास्त असेल आणि जास्त पाणी शोषून घेत असेल तर गरजेनुसार जास्त पाणी घाला.
कोमट पाणी घाला
जर तुम्हाला चपात्या जास्तवेळ मऊ राहाव्यात असं वाटत असेल तर साध्या पाण्याऐवजी कोमट पाण्याचा पीठ मळण्यासाठी वापर करा. कारण जेव्हा तुम्ही कोमट पाणी वापरता तेव्हा यातील प्रोटीन्स जास्त एक्टिव्हेट होतात. ज्यामुळे पीठ जास्त लवचीक होते. थंडीच्या दिवसांत हा उपाय जास्त प्रभावी ठरतो.
१५ ते २० मिनिटांनी चपाती करा
बरेच लोक पीठ मळल्यानंतर लगेच चपाती करायला सुरूवात करतात पण असं न करता पीठ मळल्यानंतर १५ ते २० मिनिटं झाकून ठेवा त्यानंतर चपात्या कराव्यात. चपातीसाठी तुम्ही खपली गव्हाचा वापर केल्यास अधिक पौष्टीक ठरते. रात्री मळून ठेवलेल्या पिठाच्या सकाळी चपात्या केल्यास त्या काळ्या पडतात म्हणून सकाळी ताजं पीठ मळावं. चपातीचं पीठ अधिक पौष्टीक होण्यासाठी तुम्ही यात दळताना सोयाबीन घालू शकता. चपाती शेकताना नेहमी तवा पूर्णपणे तापल्यानंतरच तव्यावर चपाती घाला अन्यथा चपाती व्यवस्थित शेकली जात नाही.
