भारतात चहा हा केवळ एक पेय नसून तो अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने केलेला चहा पित्त, ॲसिडिटी आणि पचनाच्या समस्या निर्माण करू शकतो. चहाचा शरीराला त्रास होऊ नये आणि त्याचा खरा आस्वाद घेता यावा, यासाठी डॉक्टरांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. (Which Is Right Way To Drink Tea)
चहा करण्याची योग्य पद्धत आणि डॉक्टरांचा सल्ला
डॉक्टरांच्या मते, चहामधील मुख्य घटक म्हणजे 'टॅनिन' आणि 'कॅफिन'. जेव्हा आपण चहा पावडर पाण्यामध्ये खूप वेळ उकळतो, तेव्हा त्यातील टॅनिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे चहा कडू होतो आणि पोटातील आम्लता (Acidity) वाढवते. चहा आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रथम पाणी उकळून घ्यावे. पाणी उकळल्यानंतर त्यात चहा पावडर घालावी आणि लगेच गॅस बंद करून भांड्यावर दोन मिनिटे झाकण ठेवावे. याला 'इन्फ्युजन पद्धत' म्हणतात. यामुळे चहाचा अर्क उतरतो पण तो शरीरासाठी घातक ठरत नाही.
दूध आणि साखरेचा वापर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चहा पावडर, पाणी आणि दूध एकत्र करून जास्त वेळ उकळणे आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असते. यामुळे दुधातील प्रथिने चहामधील घटकांशी प्रक्रिया करून पचनास जड होतात. जर तुम्हाला दुधाचा चहा आवडत असेल, तर चहाचा अर्क तयार झाल्यावर वरून गरम केलेले दूध आणि गरजेनुसार साखर किंवा गुळ घालावा. लक्षात ठेवा, चहामध्ये गुळ टाकायचा असेल तर तो चहा तयार झाल्यावर शेवटी घालावा, अन्यथा दूध फाटण्याची शक्यता असते.
आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, चहामध्ये आले, वेलची, लवंग किंवा तुळशीची पाने टाकणे फायदेशीर ठरते. हे घटक चहाचा दाहक गुणधर्म कमी करतात. मात्र, रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे, कारण यामुळे गॅस्ट्रिक ज्यूसवर परिणाम होऊन भूक मंदावते आणि पित्त वाढते.
चहा पिण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी पिणे नेहमीच उत्तम असते. दिवसातून २ ते ३ कपांपेक्षा जास्त चहा पिणे टाळावे, जेणेकरून झोपेवर आणि मज्जासंस्थेवर परिणाम होणार नाही. या साध्या बदलांमुळे तुम्ही चहाचा आनंद कोणत्याही त्रासाशिवाय घेऊ शकता.
