हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर लोकं आवडीने डाल तडका मागवतात. घरीही तर आपण फोडणीचे वरण करतोच मात्र विकतचे जास्त छान का बरं लागतं? कारण हॉटेलमध्ये एकच डाळ नाही तर दोन डाळींचे मिश्रण वापरले जाते. (Restaurant style dal fry, easy Indian dinner recipe, must try healthy recipes )त्यामुळे चव वेगळी लागते. तसेच फोडणीही वरतून दिली की त्याचा झणझणीतपणा जाणवतो. पाहा विकतपेक्षा भारी डाल तडका करण्याची रेसिपी.
साहित्य
तूरडाळ, मसूरडाळ, हिरवी मिरची, सुकी लाल मिरची, आलं, लसूण, कडीपत्ता, मोहरी, जिरे, कांदा, टोमॅटो, कसुरी मेथी, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, हळद, हिंग, तूप, पाणी
कृती
१. तूरडाळ आणि मसूरडाळ सम प्रमाणात घ्यायची आणि स्वच्छ धुवायची. थोडावेळ भिजत ठेवायची. नंतर एका कुकरमध्ये थोडे तूप घ्यायचे. त्यावर जिरे परतायचे. जिरे परतल्यावर त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हिरवी मिरची तसेच लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. परतून नंतर त्यात डाळींचे मिश्रण घाला आणि परतून घ्या. पाणी घाला आणि कुकर लावा. डाळ मस्त शिजवून घ्यायची. मऊ करुन घ्यायची.
२. कांदा सोलायचा आणि मस्त बारीक चिरायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. ठेचायच्या. आल्याचा तुकडा किसून घ्यायचा. टोमॅटोही चिरायचे. बारीक नको मध्यम आकाराचे तुकडे करायचे. कढईत तेल घ्यायचे. त्यावर मोहरी घालायची आणि तडतडू द्यायची. मोहरी मस्त तडतडल्यावर त्यात जिरे घालायचे. कडीपत्ता घालायचा आणि परतून घ्यायचा. कांदा घालायचा आणि परतायचा. लसूण घालायचा खमंग परतायचा. हिंग घालायचे. फोडणी छान तयार करायची आणि शिजलेल्या डाळी घालायच्या.
३. डाळ जरा मस्त परतल्यावर त्यात मीठ घालायचे. तसेच थोडं लाल तिखट घालायचं. हळद घालायची. कोथिंबीर घालायची. तसेच कसुरी मेथी हातावर मळून घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. सगळं ढवळायचं आणि त्यात कोथिंबीर घालायची. थोडं तूप घालायचं. डाळ उकळू द्यायची. जरा घट्टच ठेवा. गरजेनुसारच पाणी घाला.
४. एका फोडणीपात्रात तूप घ्यायचे. त्यावर जिरं आणि मोहरी परता. नंतर त्यात ठेचलेली लसूण आणि कडीपत्ता घाला. परतून घ्यायचे. गॅस बंद करा आणि लाल तिखट घाला. फोडणी वरणावर ओता. गरमागरम भातासोबत खा.
