रवा ढोकळा (Rawa Dhokla) करणं एकदम सोपं आहे त्यासाठी तुम्हाला खास मेहनत करावी लागणार नाही. कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात नाश्त्यासाठी चवदार रवा ढोकळा करू शकता. या ढोकळ्याची खासियत अशी की कोणतीही पूर्व तयारी न करता तुम्ही कमीत कमी वेळेत हा ढोकळा करू शकता. रवा ढोकळ्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Rava Dhokla)
१. ढोकळ्याचे मिश्रण तयार करणे
मोठ्या भांड्यात रवा, दही, साखर, मीठ, तेल आणि आल्या-मिरचीची पेस्ट घ्या. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या. जर मिश्रण खूप घट्ट वाटले, तर थोडे पाणी घाला. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवा, जेणेकरून रवा चांगला फुलेल.
२. ढोकळा शिजवण्याची तयारी
ढोकळा शिजवण्यासाठी एक जाड बुडाचे भांडे (किंवा स्टीमर) घ्या, त्यात २-३ ग्लास पाणी गरम करायला ठेवा. भांड्यात एक स्टँड किंवा जाळी ठेवा. ज्या प्लेटमध्ये/डब्यात ढोकळा शिजवायचा आहे, त्याला आतून तेल लावून ग्रीस करून घ्या.
३. इनो घालून ढोकळा शिजवणे
रवा फुलल्यानंतर, मिश्रण परत एकदा ढवळून घ्या. आता ढोकळ्याच्या मिश्रणात इनो घाला आणि त्यावर १ चमचा पाणी घाला. इनो घातल्यावर मिश्रण लगेच फुलू लागते, ते जास्त न ढवळता, फक्त एका दिशेने हलक्या हाताने मिसळा. हे मिश्रण लगेच तेल लावलेल्या प्लेटमध्ये/डब्यात ओता. गरम झालेल्या भांड्यात (स्टीमरमध्ये) स्टँडवर ही प्लेट ठेवा आणि झाकण लावा.१५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर ढोकळा वाफेवर शिजू द्या. ढोकळ्याला हात लावून किंवा सुरी टोचून तो शिजला आहे की नाही तपासा. सुरी स्वच्छ बाहेर आल्यास ढोकळा शिजला आहे.
४. फोडणी देणे
ढोकळा शिजल्यावर गॅस बंद करा आणि प्लेट बाहेर काढून थंड होऊ द्या. एका छोट्या भांड्यांमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला, ती तडतडू लागल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि तीळ घालून परतून घ्या. आता या फोडणीत २-३ चमचे पाणी आणि साखर घाला आणि एकदा उकळी येऊ द्या. गॅस बंद करा. थंड झाल्यावर ढोकळ्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. तयार केलेली फोडणी ढोकळ्याच्या तुकड्यांवर चमच्याने समानरित्या पसरवा. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने ढोकळा सजवा.
