बटाटा शक्यतो शिजवून घेऊन नंतर त्याचे विविध पदार्थ केले जातात. मात्र कच्च्या बटाट्याचेही पदार्थ असतात. जे चवीला मस्त लागतात. (Raw potato breakfast - quick and easy to make, soft potato bundosa taste great )तसेच करायला सोपे असतात. बटाटा उकडण्याचे कष्ट घ्यावे लागत नाहीत. बटाट्याचे बन चवीला एकदम मस्त लागतात. करायला फारच सोपे आहेत. नाश्त्यासाठी अगदी मस्त प्रकार आहे.
साहित्य
बटाटा, हिरवी मिरची, लसूण, आलं, पाणी, रवा, दही, मीठ, लाल तिखट, धणे- जिरे पूड, बेकींग सोडा, हिंग, कोथिंबीर, तेल, जिरे, मोहरी
कृती
१. बटाटा सोलून घ्यायचा. बटाट्याचे तुकडे करुन घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करा आणि देठ काढून घ्या. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. आल्याचा तुकडा घ्यायचा. एका मिक्सरच्या भांड्यात बटाटा, लसूण, हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घ्या त्यात थोडे पाणी घाला. मिक्सरमधून वाटून घ्या. पेस्ट तयार करा.
२. एका पातेल्यात रवा घ्यायचा. वाटीभर रवा घ्या आणि त्यात वाटीभर दही घाला. रवा आणि दही मिक्स करा अगदी थोडे पाणी घाला, पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवा. नंतर तयार केलेली पेस्ट त्यात ओता. अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचे. चमचाभर लाल तिखट, हळद, धणे - जिरे पूड त्यात घाला. मिक्स करुन घ्या.
३. एका फोडणीपात्रात चमचाभर तेल घ्यायचे आणि त्यात जिरे घालायचे. जिरं फुलल्यावर त्यात चमचाभर हिंग घाला. त्यात मोहरी घाला आणि तडतडली की ती फोडणी मिश्रणात ओता. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. चिरलेली कोथिंबीरही त्यात घाला. तसेच चमचाभर बेकींग सोडा घाला. फेटून घ्या. जास्त पातळ करायचे नाही. पेस्टपेक्षा जरा जास्त पातळ करायचे. गरज असेल तर थोडे पाणी घालायचे.
४. एका कढीत किंवा लहान पॅनमध्ये चमचाभर तेल घाला. त्यात पीठ घाला आणि त्याचा जाडसर बन तयार करा. फोडणीपात्र वापरले तरी चालेल. दोन्ही बाजूनी खमंग परतून घ्यायचे. चटणी किंवा सॉससोबत खा. चवीला हा पदार्थ एकदम मस्त लागतो.
