Join us

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला 'या' रेसिपीने भावाला करा इम्प्रेस; देऊ शकता गोड किंवा तिखट ट्विस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:02 IST

Shravan Special Recipe: भावाला गोड आवडते की तिखट, त्यानुसार या रेसेपिला देऊ शकता ट्विस्ट; घरी केली हे कोणी ओळखूही शकणार नाही!

श्रावण पौर्णिमेला(Shravan Purnima 2025) आपण नारळी पौर्णिमा(Narali Purnima 2025) तथा रक्षाबंधन(Rakshabandhan 2025) साजरी करतो. समस्त महिला मंडळाचा हा श्रावणातला आवडता सण म्हणजेच रक्षाबंधन आठवड्यावर आला. यंदा शनिवारी ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. विकेंड आल्याने अनेकींचे प्लॅन ठरलेही असतील. पण मुख्य प्रश्न येतो खाऊचा! नारळी पौर्णिमेला नारळी भात करतो, पण रक्षाबंधनाला भावासाठी काहीतरी खास करण्याची बहिणींची धडपड असते. बाजारात शेकडो मिठाई मिळत असल्या तरी घरी स्वतः काहीतरी करावे असाही प्रयत्न असतो. त्यातही भावाच्या आवडी निवडी सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असते. यासाठीच एक अशी मारवाडी रेसेपी देत आहे, जिला तुम्ही गोड किंवा तिखट ट्विट्स देऊ शकता. करायला सोपी आणि कमी साहित्यात बनणारी ही रेसेपी(Rakshabandhan Special Recipe) कशी करायची ती जाणून घ्या. ही पाककृती पाहून तुम्हाला एका मराठी पारंपरिक पाककृतींची आठवण होईल हे नक्की! आठवतंय का बघा, नाहीतर शेवटी उत्तर मिळेलच!

साहित्य :

• मैदा  - १.५ कप• तेल किंवा तूप - ३ ते ४ टेबलस्पून (गरज पडल्यास अधिक घाला)• मीठ - ½ टीस्पून

कृती : 

१. मैदा, मीठ आणि तूप/तेल एकत्र करून खूप घट्ट पीठ तयार करा.

२. झाकण ठेवा आणि १५ मिनिटे राहू द्या.

३. मध्यम आकाराचे गोळे करा.

४. प्रत्येक गोळ्याची पातळ पुरी लाटा. 

५. त्यावर सुरीने आडवे काप करून नंतर त्या पट्ट्या एकमेकांच्या जवळ आणत गोलाकार गुलाबासारख्या गुंडाळून घ्या. 

६. त्यावर थोडासा दाब द्या. 

तळण्यासाठी : 

• मंद आचेवर तेल किंवा तूप गरम करा.• तयार झालेले गुलाब न मंद आचेवर खमंग तळून घ्या. • त्याची पारी आपोआप गुलाबाच्या पाकळीसारखी फुलू लागेल. झाऱ्याने ढवळण्याऐवजी कढईचे कान धरून हळुवार तेल हलवा. गुलाब छान तळले जातील. 

एव्हाना तुम्हाला लक्षात आले असेल, की हा चिरोट्यांचा एक प्रकार आहे. चिरोट्यांना आपण साटा लावतो, इथे मारवाडी पद्धतीनुसार साटा न लावता पुरीसारखा खरपूस तळून घेतला आहे. हा तिखट करायचा असेल तर त्यावर आवडते मसाले टाकून तिखट गुलाब बनवू शकता आणि गोड हवे असतील तर पुढीलप्रमाणे पाक करून त्यात हे गुलाब घोळवू शकता. 

साखरेच्या पाकासाठी:

• साखर - २ कप• पाणी - २.५ कप• केशर काडी • जिलेबीचा रंग - चिमूटभर (पर्यायी)

कृती : 

१. साखर वितळेपर्यंत आणि थोडी चिकट पाक तयार होईपर्यंत सर्व साहित्य एकत्र गरम करा.

२. तळलेले गुलाब काही वेळ पाकात ठेवा आणि पाक छान मुरल्यावर गुलाब बाहेर काढा. 

सर्व्ह करताना ड्राय फ्रुट आणि गुलाबाच्या पाकळ्या घालायला विसरू नका. छानशा डब्यात पॅकिंग केले तर ही मिठाई घरी केली आहे हे कोणी ओळखूही शकणार नाही!

पहा व्हिडीओ -

टॅग्स :रक्षाबंधनश्रावण स्पेशल पदार्थश्रावण स्पेशलपाककृतीअन्न