Join us

पावसाळा स्पेशल ब्रेड पॅटीस रेसिपी, आतून लावा 'ही' चटणी- ही चव जन्मभर लक्षात राहील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 15:51 IST

Rainy season special bread patties recipe, apply 'this' chutney inside - monsoon food : पावसाळ्यात करा ब्रेड पॅटीस घरीच. आतून चटणी लावायची. म्हणजे चव होते दुप्पट.

साहित्य ब्रेड, बेसन, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, कडीपत्ता, कोथिंबीर, बटाटा, तेल, पाणी, ओवा 

चटणीसाठी सामग्रीलसूण, आलं, दही, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लिंबू, मीठ, जिरे पूड

१. चटणी तयार करण्यासाठी काही लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. आल्याचा एक लहान तुकडा घ्यायचा. कोथिंबीर घ्यायची. छान ताजी कोथिंबीर घ्या. तसेच पुदिन्याची पाने घ्यायची. त्यात थोडा लिंबाचा रस पिळायचा. (Rainy season special bread patties recipe, apply 'this' chutney inside - monsoon food)थोडी जिरे पूड घालायची. जिरे पूड नसेल तर दोन चमचे जिरे घाला. त्यात दोन चमचे दही घाला आणि मग थोडे पाणी घाला. चटणी छान वाटून घ्यायची. अति पातळ करु नका. जरा घट्टच ठेवायची.

२. एका खोलगट पातेल्यात बेसनाचे पीठ घ्यायचे. बेसन जर तीन चमचे घेतले तर त्यात चमचाभर तांदळाचे पीठ घालायचे. त्यात चमचाभर मीठ घालायचे. थोडा ओवा हातावर मळून पीठात घालायचा. चमचाभर हळद घालायची. अति पातळ करु नका. जरा घट्ट पीठ तयार करायचे. वड्यासाठी जसे पीठ करता अगदी तसेच. 

३. बटाटे उकडून घ्यायचे. उकडलेले बटाटे गार झाल्यावर सोलून घ्यायचे. बटाटे व्यवस्थित कुसकरायचे. त्यात अख्खा तुकडा राहणार नाही याची काळजी घ्यायची. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात मोहरी घालायची आणि तडतडू द्यायची. नंतर थोडे जिरे घालायचे आणि परतायचे. आलं-लसूण-हिरवी मिरची अशी पेस्ट तयार करायची. फोडणीत कडीपत्ता घालून परतला की मग लसणाची पेस्ट घाला आणि खमंग परता. 

४. परतून झाल्यावर त्यात हळद घाला, लाल तिखट घाला, चवी पुरते मीठ घाला आणि मसाला परतून घ्या. मग त्यात अगदी चमचाभर पाणी घाला. पाण्यामुळे मसाले शिजतील. नंतर त्यात कुसकरलेला बटाटा घाला आणि मस्त परतून घ्या. मसाले आणि बटाटा एकजीव करुन घ्यायचा. 

५.कढईत तेल गरम करत ठेवायचे. तेल तापल्यावर त्यातील अगदी दोनच चमचे तेल बेसन पीठात घालून कालवून घ्यायचे. मसाला तयार झाल्यावर ब्रेड घ्यायचा. त्रिकोणी कापायचा. एका तुकड्याला चटणी लावायची तर दुसर्‍या तुकड्याला बटाट्याचा मसाला. एकावर एक ब्रेड ठेवायचा आणि मग बेसन पीठात बुडवायचा. मग ते गरम तेलात सोडायचे. छान खमंग तळून घ्यायचे. गरमागरम खाऊन घ्यायचे. सोबत चहा असेल तर मग मज्जाच.          

टॅग्स :अन्नपाऊसकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती