भाताचे अनेक प्रकार आपण करत असतो. खिचडी, फोडणीचा भात, मसाले भात, पुलाव आणि इतरही अनेक प्रकार केले जातात. हे सारे पदार्थ चवीला छान असतात. असाच एक चविष्ट पदार्थ म्हणजे हा साऊथ इंडियन स्टाइल बटाट्याचा भात. ज्याला पोटॅटो राइस असे म्हटले जाते. करायला अगदी सोपा आहे. डब्यासाठी करु शकता. (Potato Rice - Instant recipes, easy and delicious recipe)नाश्त्यासाठी आणि जेवणासाठीही करु शकता. मस्त असा हा पदार्थ लहान मुलांनाही नक्की आवडेल. पाहा कसा करायचा हा भाताचा प्रकार.
साहित्य
तांदूळ, बटाटा, काश्मिरी लाल मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, कांदा, तेल, जिरे, कांदा, टोमॅटो, सांबार मसाला, मीठ, हळद, पाणी, उडदाची डाळ
कृती
१. बटाटा सोलून घ्यायचा. स्वच्छ धुवायचा आणि त्याचे लहान तुकडे करायचे. त्यातील पाणी काढून त्यात हळद घालायची. तसेच आवडीनुसार लाल तिखट घाला. बटाट्याला सगळीकडे व्यवस्थित मसाला लागेल याची काळजी घ्या. बटाटे हाताने ढवळा आणि त्याला मसाला छान लावा.
२. कढईत थोडे तेल घ्या. त्यात बटाटे घाला आणि मस्त परतून घ्या. कुरकुरीत परतायचे. नंतर बटाटा काढून घ्या आणि त्यातच चमचाभर जिरे घाला. एखादी काश्मिरी लाल मिरची घाला. भिजवलेली उडदाची डाळ घाला आणि मस्त परतून घ्या. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. चिरलेला कांदा फोडणीत घालायचा. मिरची आणि कांदा छान परता. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो अगदी थोडा घाला. जास्त नको. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवा. एक वाफ काढून घ्या.
३. त्यात चवी पुरते मीठ घाला. ढवळून घ्या. आणि शिजवलेला भात त्यात घाला. मस्त मोकळा असा भात असेल तर चव जास्त छान लागते. त्यात थोडा सांबार मसाला घाला. सांबार मसाल्यामुळे या भाताला वेगळीच चव येते. त्यामुळे नक्की घालाच.
४. बाजूला काढून ठेवलेले बटाटे घाला आणि ढवळून घ्या. भाताला मसाला छान लागेल याची काळजी घ्या. झाकण ठेवा आणि दोन ते पाच मिनिटे शिजू द्या. गरमागरम भात खा. त्यासोबत दही घेऊ शकता. चव आणखी छान लागेल.