पौष्टिक नाश्त्याने सकाळची सुरुवात केल्याने संपूर्ण दिवसभर ऊर्जा मिळते. पोहे आणि उपमा हा अनेक घरांमधील लोकप्रिय नाश्ता आहे. दोन्ही पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. ते तयार करणं देखील सोपं आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही कमी कॅलरी असलेले पदार्थ आहेत, ज्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
पोहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत, तर उपमा हा दक्षिण भारतातील लोकप्रिय नाश्ता आहे. दोन्हीही स्वादिष्ट आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. परंतु अनेकदा प्रश्न पडतो की, दोघांपैकी कोणता नाश्ता अधिक आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. जर तुम्हालाही अशा प्रश्न पडला असेल, तर चला जाणून घेऊया कोणता नाश्ता तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?
पोहे खाण्याचे फायदे
पोहे हा एक हलका नाश्ता आहे. त्यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं, जे अशक्तपणाशी लढण्यास मदत करतं. पोहे फायबरचा देखील एक चांगला सोर्स आहे, जे भूक कमी करण्यास मदत करतं आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करतं. नाश्त्यात पोहे खाल्ल्याने पचन सुधारतं आणि पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात.
उपमा खाण्याचे फायदे
उपमा रव्यापासून बनवतात, ज्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि काही भाज्यांचा समावेश असतो. उपमा खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. त्यातील कार्बोहायड्रेट्स ऊर्जा प्रदान करतात आणि शरीराला बराच काळ पोटभर ठेवतात. उपमामध्ये भाज्या घालल्याने त्याचं पौष्टिक मूल्य आणखी वाढतं.
पोहा की उपमा, जास्त चांगलं काय?
पोहे आणि उपमा हे दोन्हीही आरोग्यदायी पर्याय मानले जातात. दोन्ही खाण्यास आणि पचण्यास हलके असतात. दोघांचे वेगळे फायदे आहेत. वजन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी पोहे हा एक चांगला पर्याय आहे कारण त्यात कॅलरीज कमी असतात. पचन सुधारण्यासाठी आणि दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी तुम्ही नाश्त्यात उपमा खाऊ शकता. उपमा हे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन्सचा एक उत्तम सोर्स आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करू शकता.