नाश्त्याला काय करायचे ? अर्थात अनेकविध पदार्थ केले जातात. मात्र सगळ्यात जास्त काही केले जात असेल तर ते म्हणजे पोहे आणि उपमा. (poha bhaji- upma cutlets, see 2 crunchy recipes! use leftover food in good way )करायला सोपे तसेच सगळ्यांच्या आवडीचे. कांदा पोहे, बटाटा पोहे, मसाला उपमा, उपीट, तिखट सांजा असे पदार्थ केले जातात. पाहुणे आले तरी आई विचारते पटकन पोहे टाकू का ? आपल्याकडे तर मुलगी बघायचा कार्यक्रमही पोह्यांशिवाय अपूर्ण असतो. पण पोहे उपमा हे पदार्थ एकदा उरले की त्याच काय करायचं असा प्रश्न पडतो. गार उपमा आणि शिळे चामट पोहे अजिबात खावेसे वाटत नाहीत. अर्थात भारतात कोणताही पदार्थ वाया जात नाही. अनेक जुगाडू रेसिपी आपल्याकडे आहेत.
शिल्लक पोह्याची मस्त खमंग भजी करता येते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे.
साहित्यबेसन, कांदा, तांदळाचे पीठ, फोडणीचे पोहे, पाणी, तेल
कृती१. एका खोलगट पातेल्यात फोडणीचे पोहे घ्यायचे. त्यात थोडे बेसन घालायचे. तसेच थोडे तांदळाचे पीठ घालायचे. कांदा एकदम बारीक चिरायचा. चिरलेला कांदा त्यात घालायचा. एकदा व्यवस्थित मिक्स करुन घ्यायचे.
२. त्यात थोडे पाणी घालून सैलसर पीठ मळायचे. कांदा भजीसाठी जसे पीठ मळता अगदी तसेच. कढईत तेल तापत ठेवायचे. तेल छान तापल्यावर मध्यम आकाराची भजी तळून घ्यायची. खमंग कुरकुरीत भजी करायची.
शिल्लक उपम्याचेही छान मऊ असे कटलेट करता येतात. करायला जास्त वेळही लागत नाही.
साहित्यउपमा, रवा, तेल, बटाटा, लाल तिखट
कृती१. बटाटा उकडून घ्यायचा. उकडलेला बटाटा कुसकरायचा आणि एका खोलगट पातेल्यात घ्यायचा. त्यात शिल्लक उपमा घालायचा. त्यात चमचाभर लाल तिखट घालायचे आणि मस्त मिक्स करायचे. मऊ सैलसर पिठाच्या टिक्की करायच्या.
२. एका ताटलीत रवा घ्यायचा. त्यात तयार केलेल्या टिक्की लावायच्या. सगळीकडे छान रवा लागला की तव्यावर तेल घालून त्यावर त्या टिक्की परतून घ्यायच्या. छान खमंग कुरकुरीत होतात. चवीला मस्त लागतात. नक्की करुन पाहा.