पनीरचे पदार्थ आपण आवडीने घरी करतो. पनीर पौष्टिक तर असतेच आणि चवीलाही मस्त असते. पनीरची भाजी करताना त्रास फक्त एकच असतो तो म्हणजे पनीर परतणे. (Paneer sticks to the pan while frying? try these 5 tricks , make tasty paneer recipes )पनीर तळल्यावर ते फार तेल शोषते त्यामुळे ते अत्यंत अनहेल्दी होते. त्यामुळे थोड्या तेलावर ते परतून घेणे जास्त फायद्याचे ठरते. मात्र पनीर परताना कढईला, पॅनला चिकटते आणि करपते त्याचा लगदा होतो. असे होऊ नये यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा.
पनीर परतताना ते कढईला चिकटते किंवा करपते ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यामुळे भाजीची चव बिघडते. खरं तर पनीर मऊसर आणि नाजूक असल्यामुळे ते लगेच चिकटते. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य पातेलं निवडणे. लोखंडी किंवा पातळ कढईऐवजी नॉन-स्टिक, जाड किंवा स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरला तर पनीर कमी चिकटते. परतण्याआधी कढई नीट गरम करणे आवश्यक आहे. कारण थंड कढईत पनीर टाकल्यास ते लगेच तळाशी चिकटते. गरम कढईत थोडे तेल किंवा तूप व्यवस्थित पसरवून मग पनीरचे तुकडे टाकल्यास ते
चिकटत नाहीत. लगेच परतण्याची प्रक्रिया सुरु होते.
पनीरचे तुकडे फार वेळ परतल्यास ते करपतात. त्यामुळे ते फक्त हलके सोनेरी रंग येईपर्यंत परतणे पुरेसे असते. पनीर परतण्यापूर्वी त्यावर थोडे कॉर्नफ्लोअर, बेसन किंवा रवा लावायचे आणि पातळ आवरण तयार करायचे त्यामुळे तुकडे चिकटत नाहीत. तेलाचे प्रमाणही योग्य असावे, खूप कमी तेल वापरल्यास पनीर लवकर करपते. त्यामुळे तेल जरा जास्त घ्या. नंतर परतलेले पनीर पाण्यात बुडवून तेल काढून घ्या.
कधी कधी पनीर परतण्याऐवजी थोडे उकळून किंवा गरम पाण्यात दोन मिनिटे ठेवून ते थेट भाजीमध्ये घातले तरीही चव छान लागते आणि चिकटण्याचा प्रश्नच नाही. एकूणच पनीर योग्य तापमानावर, योग्य तेलात आणि योग्य पद्धतीने परतले तर ते ना करपते ना कढईला चिकटते आणि भाजीची चवही अप्रतिम लागते.
तरीही जर पनीर चिकटलेच. तर मग बाजूने पाणी सोडायचे आणि त्यावर झाकण ठेवायचे. एक मिनिटभर झाकण तसेच ठेवा. नंतर झाकण काढा आणि झाऱ्याने तुकडे काढण्याचा प्रयत्न करा अगदी आरामात निघतात. करपलेला भागही वेगळा करता येतो.