पनीर(Paneer) म्हटलं की अनेकांना पनीरचे चमचमीत पदार्थ आठवतात. सतत त्याच त्या भाज्या खाण्याचा कंटाळा आला तर तुम्ही पनीरच्या चवदार, चवीष्ट रेसिपीजं ट्राय करू शकता (Cooking Tips). पनीरच्या रेसिपीजमध्ये सर्वांना आवडणारी म्हणजे पनीर भुर्जी (Paneer Bhurji). नॉनव्हेज न खाणारे किंवा खाणारेसुद्धा पनीर भुर्जी आवडीनं खातात. पनीर भुर्जी हा पदार्थ उत्तर भारतीय संस्कृतीतील एक महत्वपूर्ण पदार्थ आहे.
जेव्हा झटपट, पोटभरीचा नाश्ता खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही ही डीश ट्राय करू शकता. हा पदार्थ चवीला अप्रतिम असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. हॉटेलमध्ये मिळते तशी खास पनीर भुर्जी घरीच करणं एकदम सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. पनीर भुर्जीची सोपी रेसिपी पाहूया.(Paneer Bhurji Recipe)
पनीर भुर्जीसाठी लागणारं साहित्य
पनीर: २०० ग्रॅम (किसलेले)
कांदा: १ मोठा (बारीक चिरलेला)
टोमॅटो: १ मोठा (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची: १-२ (बारीक चिरलेली)
आले-लसूण पेस्ट: १ चमचा
तेल: २ मोठे चमचे
बटर: १ मोठा चमचा (पर्यायी)
जिरे: अर्धा चमचा
हळद: अर्धा चमचा
धने पूड: १ चमचा
लाल तिखट: १ ते १.५ चमचा (चवीनुसार)
गरम मसाला: अर्धा चमचा
मीठ: चवीनुसार
कोथिंबीर: बारीक चिरलेली (सजावटीसाठी)
पनीर भुर्जीची सोपी रेसिपी
१) एका कढईत तेल गरम करा आणि त्यात जिरे टाका जिरे तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या.
२) आता बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटो शिजल्यावर त्यात हळद,लाल तिखट,धने पूड आणि गरम मसाला घालून मसाले चांगले परतून घ्या. मसाले परतल्यावर त्यात किसलेले पनीर आणि चवीनुसार मीठ घाला.
३) सर्व मिश्रण हळूवारपणे एकत्र करा. ५-७ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. पनीर खूप जास्त शिजवू नका, नाहीतर ते कडक होऊ शकते. सजावटीसाठी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
