कांदा लसूण या पदार्थांची खीर हे ऐकून थोडं वेगळं वाटणं साहजिक आहे. पण खरंच नैनीतालच्या महिलांनी हा प्रयोग केला आहे. कांदा, लसूण एखाद्या पदार्थामध्ये असले की त्या पदार्थाची चव जास्त खुलते. त्याला एक वेगळाच खमंगपणा येतो. त्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांमध्ये, आमटीमध्ये, चटण्यांमध्ये आपण कांदा आणि लसूण आवर्जून टाकतो. पण त्याची खीरही करता येते हे आजवर बहुतांश लोकांना माहितीच नाही. एवढंच काय पण कांदा किंवा लसूण वापरून एखादा गोड पदार्थही करता येतो, ही कल्पनाही थोडी वेगळीच वाटते. पण असा एक प्रयोग नैनीतालच्या महिलांनी केला असून ती खीर अतिशय रुचकर होते, अशी प्रतिक्रिया त्यांना खवय्यांकडून नेहमीच येते.(how to make onion garlic kheer?)
कशी करतात कांदा- लसूण खीर?
कांदा आणि लसूण यांची वेगवेगळी खीर केली जाते. नैनीतालमध्ये काही महिला स्वयंसहायता गट आहेत. या गटाच्या महिलांद्वारे कांद्याची खीर आणि लसूणाची खीर केली जाते. ही खीर कशी करतात याची रेसिपी या महिला सोशल मीडियावर पाहूनच शिकलेल्या आहेत.
नेहमीच विकतचं दही खाता? आरोग्यासाठी ते कितपत चांगलं? दही विकत आणताना ३ गोष्टी तपासा
आता जर तुम्हाला लसूण खीर करायची असेल तर त्यासाठी लसूण आधी सोलून घ्यायचा. त्यानंतर तो व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसात चांगला मुरू द्यायचा. त्यानंतर तो वाळवून घ्यायचा आणि नंतर ड्रायफ्रूट्स, दूध आणि साखर टाकून शिजवून घ्यायचा. अशा पद्धतीने केलेली खीर अतिशय चवदार तर होतेच पण हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी, संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठीही अधिक फायदेशीर ठरते अशी माहिती ती खीर करणाऱ्या किरण बिष्ट यांनी न्यूज१८ ला दिली.
कांद्याची खीर करण्याची रेसिपी
कांद्याची खीर कशी करायची, याची खास रेसिपी फरहा हसन यांनी सांगितली. त्या म्हणतात की कांद्याची खीर हा हैद्राबादचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. त्यांनी ही खीर नैनीतालमध्येही करून पाहिली आणि तिथल्या लोकांना ती खूप आवडली.
रात्री दूध पिणं सगळ्यात जास्त फायदेशीर! तज्ज्ञ सांगतात दूध पिण्याची योग्य पद्धत- होतील ३ फायदे
कांद्याच्या खिरीची रेसिपी सांगताना त्या म्हणाल्या की कांदा आधी चिरून घ्यायचा आणि नंतर उकडून घ्यायचा. त्यानंतर तूप, खवा, दूध आणि साखर असं साहित्य घालून तो शिजवायचा. त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकले की खिरीची चव आणखीन खुलते.. रेसिपी ऐकून तुम्हालाही हे दोन पदार्थ खावे वाटले तर नक्की प्रयोग करून पाहा.