भारतात छोले हा पदार्थ तसा फार लोकप्रिय आहे. भातासोबत, चपातीसोबत मस्त लागतात. तसेच भटूरे आणि छोले ही खास डिश जगभरात प्रसिद्ध आहे. छोले करायला फारच खटाटोप असतो असे मानले जाते. (One Pot Chole Recipe - Make spicy Chole in Half an Hour, So Delicious recipe, must try) मात्र ही रेसिपी पाहिल्यावर हे विधान एकदम चुकीचे ठरेल. कारण वन पॉट छोले करता येतात. अगदी सोपी रेसिपी आहे. छोले वेगळे शिजवायचीही गरज नाही. पाहा कसे करायचे. नक्की करुन पाहा.
साहित्य
छोले, कांदा, तेल, तमालपत्र, हिरवी मिरची, टोमॅटो, वेलची, लवंग, काळीमिरी, आलं, लसूण, पाणी, चहा पूड, लाल तिखट, छोले मसाला, गरम मसाला, कसूरी मेथी, लिंबू, हिंग, मीठ
कृती
१. रात्रभर छोले भिजत ठेवायचे. सकाळी पाणी काढून टाकायचे आणि एकदा धुवायचे. एका कुकरमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यात तमालपत्र घालायचे तसेच वेलची घालायची आणि लवंगही घालायची. थोडी काळीमिरी घालायची आणि मसाले छान परतायचे. कांदा एकदम मस्त बारीक चिरायचा. त्यात कांदा घालायचा आणि छान परतायचा.
२. आल्याचा लहान तुकडा घ्यायचा तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या आणि त्याची पेस्ट तयार करायची. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. मिरचीचे तुकडे आणि आले-लसूण पेस्ट फोडणीत घालायची. छान परतायचे. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि हळद घालून टोमॅटोही परतायचा.
३. कपभर पाण्यात चहा पूड घालायची आणि उकळवायची. दोन चमचे पूड भरपूर झाली. व्यवस्थित उकळा जास्त कडवट होणार नाही याची काळजी घ्या. त्यात लाल तिखट घाला, मीठ घाला, हिंग घाला आणि छोले मसालाही घाला. तसेच गरम मसाला घाला आणि छान परतून घ्या. छोले घाला आणि ढवळून घ्या. छोले आणि मसाले पाच मिनिटे परता त्यात चहाचे पाणी गाळून घाला. साधे पाणी घाला आणि कुकर लावा. पाण्याचे प्रमाण चुकवू नका. भाजी जरा घट्ट होईल एवढेच पाणी घाला. कुकर लावा आणि दोन शिटी जास्त होऊ द्या. कुकर उघडल्यावर त्यात लिंबू पिळा आणि थोडी कसूरी मेथी हातावर मळून घाला. दोन मिनिटे उकळवा आणि गरमागरम खायला घ्या.