तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यासाठी करा काहीतरी वेगळे. बटाट्याची झटपट होणारी कचोरी कधी खाल्ली का? स्टफींग करायचे कष्ट नाहीत. (No flour or soda - make delicious potato kachori in no time, taste is so good, it will be ready in no time)फक्त मोजके सामान वापरुन मस्त कुरकुरीत कचोरी तयार करता येते. मैद्याचीही गरज नाही. पाहा कशी करायची बटाट्याची कचोरी.
साहित्य बटाटा, गव्हाचे पीठ, तेल, जिरे, तीळ, हिरवी मिरची, हिंग, मीठ, हळद, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, पाणी, रवा, कोथिंबीर
कृती१. बटाटे कुकरला लावायचे आणि छान उकडून घ्यायचे. बटाटा उकडल्यावर गार करायचा आणि त्याची सालं काढून घ्यायची. बटाटा व्यवस्थित कुस्करायचा. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. तसेच लसुणही बारीक चिरायचा. कोथिंबीरीची ताजी जुडी निवडून घ्या. कोथिंबीरही छान बारीक चिरुन घ्यायची.
२. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. तेलात थोडे जिरे घालायचे. चमचाभर हिंग घालायचे. जिरे छान फुलल्यावर त्यात पांढरे तीळ घालायचे आणि परतायचे. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि मग बारीक चिरलेला लसूण घालायचा. छान परतून घ्यायचे. त्यात कुस्करलेला बटाटा घाला आणि मग त्यात चमचाभर हळद घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. गरम मसाला आणि धणे पूडही घालायची. चवीपुरते मीठ घालायचे. त्यात थोडे पाणी घालायचे. ढवळायचे आणि जरा घट्ट व्हायला लागल्यावर त्यात वाटीभर गव्हाचे पीठ कोथिंबीर आणि दोन ते चार चमचे रवा घालायचा. मिश्रण घट्ट होईल मग गॅस बंद करायचा. जास्त घट्ट नाही जरा मऊच.
३. नंतर मिश्रण गार करायचे. गार झाल्यावर त्याला गोल वड्यासारखा आकार द्यायचा. नंतर एका कढईत तेल गरम करत ठेवायचे. तेल तापल्यावर त्यात एक एक करुन कचोरी सोडायची आणि मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळायची. बाहेरुन गोल्डन आणि आत पिवळसर अशी कचोरी तयार होते.