अनेकदा घरामध्ये ओले खोबरे उपलब्ध नसते किंवा काहींना आरोग्याच्या कारणास्तव नारळ टाळायचा असतो. अशा वेळी नारळाचा वापर न करताही आपण हॉटेलसारखी चविष्ट, दाटसर आणि जिभेला चव आणणारी पांढरी व लाल चटणी बनवू शकतो (No coconut Chutney Recipe). नारळाऐवजी डाळवे, शेंगदाणे किंवा भाजलेल्या भाज्यांचा वापर करून तयार केलेल्या या चटण्या चवीला अप्रतिम लागतात आणि इडली, डोसा किंवा मेदूवड्यासोबत अगदी चवदार लागतात . नारळ न वापरता 2 प्रकारच्या चटण्या करणं खूपच सोपं आहे. ज्या तुम्ही इडली, डोसा, मेदू वडा किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. सोपी रेसिपी तुम्ही 10 मिनिटांत करू शकता. (How To Make coconut Chutney)
1) पांढरी चटणी
नारळाला उत्तम पर्याय म्हणून तुम्ही भाजकी डाळ (फुटाण्याची डाळ) किंवा शेंगदाण्याचा वापर करू शकता. ही चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी भाजकी डाळ, पाव वाटी दही, २-३ हिरव्या मिरच्या, थोडे आले आणि चवीनुसार मीठ एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घ्या. दह्यामुळे चटणीला छान पांढरा शुभ्र रंग आणि मऊपणा येतो. ही चटणी अधिक चविष्ट करण्यासाठी त्यावर मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी द्या. ही चटणी चवीला अगदी हॉटेलमधील ओल्या खोबऱ्याच्या चटणीसारखीच लागते आणि इडली किंवा डोशासोबत उत्तम लागते.
2) लाल ओली चटणी
लाल चटणी बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटोचा किंवा लाल मिरचीचा बेस म्हणून वापर करणे सर्वोत्तम ठरते. एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, एक टोमॅटो, ४-५ लसूण पाकळ्या आणि ३-४ सुक्या लाल मिरच्या परतून घ्या. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडी चिंच घालून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. या चटणीला दाटपणा येण्यासाठी तुम्ही त्यात थोडे भाजलेले शेंगदाणे किंवा डाळवे देखील घालू शकता. शेवटी, या चटणीला जिरं आणि कढीपत्त्याची तडतडीत फोडणी दिल्यास या चटणीची चव द्विगुणित होते. ही चटणी उत्तपा किंवा वड्यासोबत चविष्ट लागते.
