नवरात्रीसाठी विविध रेसिपी घरोघरी केल्या जातात. मात्र काही पदार्थ असे असतात, जे एकदा करुन ठेवले की बरेच दिवस पुरतात. जसे की चकली दिवाळीला मस्त भाजणीची चकली केली जाते. त्याच प्रमाणे नवरात्रीच्या दिवसात खाण्यासाठी खमंग उपासाची चकली करता येते. टिकतेही बरेच दिवस आणि चवीला एकदम भारी असते. करायलाही सोपी आहे. पाहा साबुदाणा आणि वरीची चकली करायची सोपी रेसिपी.
साहित्य साबुदाणा, वरी तांदूळ, राजगिरा, मीठ, लाल तिखट(उपासाला खात असाल तरच घ्या), पाणी, तेल
कृती१. एका कढईत किंवा पॅनमध्ये वाटीभर साबुदाणा भाजून घ्यायचा. पाच मिनिटे साबुदाणा भाजायचा आणि मग एका पसरट ताटलीत काढून घ्यायचा. गार करत ठेवायचा. त्याच पॅनमध्ये वाटीभर वरी तांदूळ भाजायचे. तांदूळही पाच मिनिटे भाजायचे आणि मग एका ताटलीत गार करत ठेवायचे. साबुदाणा गार झाल्यावर त्याचे सरसरीत, बारीक पीठ मिक्सरमधून वाटून घ्या. तसेच वरीचेही पीठ वाटून घ्यायचे. दोन्ही वेगवेगळे वाटा म्हणजे व्यवस्थित वाटले जाते.
२. मिक्सरमधून वाटीभर राजगिराही वाटून घ्यायचा. सगळी पिठं एका परातीत एकत्र घ्यायची. एकजीव करायची. हाताच्या मदतीने मिक्स करायची. त्यात चवी पुरते मीठ घालायचे. तसेच जर उपासाला तुमच्याकडे लाल तिखट चालत असेल तर लाल तिखट घाला. नसेल चालत तर नाही घातले तरी चव मस्तच लागते. त्यात जिरे पूडही घालू शकता. पळीभर तेल गरम करायचे. जरा कोमट झाल्यावर मोहन पिठावर ओतायचे. चमच्याने ढवळायचे. आणि मग हाताने छान मिक्स करायचे.
३. मोहन मिक्स झाल्यावर त्यात हळूहळू कोमट पाणी घालायचे आणि पीठ मळायचे. घट्ट असे पीठ मळायचे. जसे भाजणीचे पीठ मळता अगदी तसेच मळायचे. पीठ मळून झाल्यावर त्याचे गोळे तयार करायचे आणि चकली पात्रात घ्यायचे. त्याच्या मस्त चकल्या पाडायच्या. तेल एकदम गरम करायचे. कढत तेलात एकएक करुन चकली सोडा आणि तळून घ्या. मस्त खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे. म्हणजे छान खुसखुशीत चकली तयार होते. कुरकुरीत तर होतेच शिवाय २० दिवस टिकते. फक्त साठवून ठेवताना हवाबंद डब्यात ठेवा. म्हणजे मऊ पडणार नाही.