आजच्या धावपळीच्या जगात भारतीयांना आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र याला आपली जीवनशैली किंवा आहार नाही तर आपले 'पालक' जबाबदार आहेत असं खळबळजनक विधान डॉ. मनसफा बेपारी यांनी केलं आहे. एका सोशल मीडिया व्हिडिओद्वारे डॉक्टरांनी मांडलेल्या या मतांमुळे सध्या इंटरनेटवर मोठा वाद निर्माण झाला आहे.
डॉक्टरांचं म्हणणं काय?
डॉ. मनसफा यांच्या मते, आपल्या पालकांनी आणि आजी-आजोबांनी अशा काळात आयुष्य काढलं जेव्हा अन्न अत्यंत महत्त्वाचं होतं. त्या काळात शारीरिक कष्ट जास्त होतं, लोक शेतात काम करायचे, खूप अंतर पायी चालायचे, मानसिक ताण कमी होता. त्यामुळे "ताट पूर्ण संपवा", "जास्त भात खा" किंवा "तूप म्हणजे औषध आहे" हे त्यांचे सल्ले त्या काळासाठी अत्यंत योग्य होते.
आजच्या पिढीचं आयुष्य बदललं
२० ते ३० वयोगटातील तरुण आता तासनतास एका जागी बसून काम करतात, मानसिक ताण जास्त आहे आणि शारीरिक हालचाल कमी आहे. अशा स्थितीत पालकांच्या त्याच जुन्या सल्ल्यानुसार आहार घेतल्याने तरुणांमध्ये लठ्ठपणा, थायरॉईड, डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर आणि पोटाचे विकार वाढत आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं. "पालकांचा आदर करा, पण न्यूट्रीशन स्वतः शिका" असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
Most of Indians are unhealthy not because of their diet but may be because of their parents.
— Dr. Mansafa Bepari (@MANSAFAB) December 27, 2025
Our parents and grandparents lived in a society of food scarcity where eating more was smart but now things have changed.
Watch video to learn more. pic.twitter.com/P1WMLkZhbp
"ताटात अन्न शिल्लक ठेवायचं नाही"
सोशल मीडियावर यावरून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी डॉक्टरांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. एका युजरने म्हटले की, "लहानपणापासून ताटात अन्न शिल्लक ठेवायचं नाही ही सवय लागल्यामुळे पोट भरलेलं असतानाही आपण अतिरिक्त जेवतो, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे." भारतात अन्नाला प्रेमाशी जोडले जातं (उदा. 'आणखी एक चपाती घे'), हेच लठ्ठपणाचे कारण असल्याचं काहींनी म्हटलं.
"तरुण पिढी फक्त जिभेचे चोचले पुरवते"
डॉक्टरांच्या या विधानानंतर सोशल मीडिया दोन गटांत विभागला गेला आहे. काही नेटकऱ्यांनी पालकांची बाजू घेतली आहे. त्यांच्या मते, स्वतःच्या चुकीच्या सवयींसाठी पालकांना दोष देणं अत्यंत चुकीचं आहे. पालक नेहमीच 'घरचे जेवण' आणि व्यायामाचा सल्ला देतात, पण तरुण पिढी फक्त जिभेचे चोचले पुरवते. भेसळयुक्त अन्न आणि जंक फूड ही आरोग्यासाठी खरी समस्या असल्याचेही अनेकांनी नमूद केलं आहे.
