शेवग्याच्या शेंगांची अशी आमटी एकदा नक्की करा. चवीला मस्त आणि करायला सोपी. (moringa recipe, drumsticks daal easy and healthy recipe, try Maharashtrian food )शेवगा आरोग्यासाठी फार चांगला असतो. आहारात शेवगा असेल तर मोरींगा पावडर वगैरे घ्यायची वेळच येणार नाही.
फोडणीसाठी साहित्य
तेल ,लाल तिखट, हळद, हिंग, कडीपत्ता, गरम मसाला, जिरे, मोहरी
आमटीसाठी साहित्य
शेवग्याच्या शेंगा, कांदा, हिरवी मिरची, नारळ, कोथिंबीर, पाणी, आलं, लसूण, मीठ, तूरडाळ
वाटणासाठी सामग्री
सुकं खोबरं, तीळ, कोथिंबीर, जिरे, कांदा
कृती
१. वाटण करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं घ्यायचं. त्यात दोन ते चार चमचे जिरे घालायचे. लहान कच्चा कांदा घालायचा. थोडे पांढरे तीळ घालायचे. कोथिंबीर घालायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. त्याही वाटणासाठी घ्या.
तसेच चवी पुरते मीठ घालायचे आणि अगदी थोडे पाणी घालायचे. सगळे पदार्थ छान वाटून घ्यायचे. वाटण तयार करणे अगदीच सोपे आहे. वाटण जास्त पातळ करु नका. जरा घट्टच राहू द्यायचे.
२. कांदा सोला आणि छान बारीक चिरुन घ्यायचा. ताजा नारळ खवून घ्यायचा. कोथिंबीरीची ताजी जुडी निवडायची. कोथिंबीर छान बारीक चिरायची. शेवग्याच्या शेंगांचे मध्यम आकाराचे तुकडे करायचे. तूरडाळ शिजवून घ्यायची. कुकरमध्येच शिजवा म्हणजे लवकर आणि मऊ होते.
३. एका कढईत तेल घ्यायचे. त्यात हिंग घालायचे. तसेच जिरे घालायचे. जिरे छान फुलल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की त्यात शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि जरा परतायच्या. शेंगा थोडावेळ परतून झाल्यावर ताजा नारळ घालायचा. मग त्यात तयार केलेले वाटण घालायचे. वाटण छान खमंग परतायचे. वाटण परतून झाल्यावर त्यात शिजवलेली तूरडाळ घालायची. थोडे पाणी घालायचे. हळद , लाल तिखट, गरम मसाला घाला आणि झाकण ठेवा. एक वाफ काढायची मग गरजेनुसार पाणी घालायचे.
४. आमटी उकळल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आमटी जरा पातळच करायची. ती पुन्हा घट्ट होतेच.