मुगाच्या डाळीचा डोसा हा केवळ चविष्टच नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानला जातो आणि पौष्टीक नाश्ता मानला जातो. प्रथिनांनी समृद्ध असलेल्या या पदार्थामुळे शरीराला उर्जा मिळते तसंच पोट बराचवेळ भरलेलं राहतं. पचायला हलका असल्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण याचा आनंद घेऊ शकतात. (Moong Dal Chilla For Breakfast)
वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा डोसा खाणं हा उत्तम पर्याय आहे. चवीला कुरकुरीत आणि दिसायला आकर्षक असणारा हा मुगाचा डोसा तुम्ही हिरवी चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता. झटपट आणि सोप्या पद्धतीनं मुगाच्या डाळीचा डोसा कसा करायचा ते पाहू. (Moong Dal Chilla Recipe)
मुगाच्या डाळीचा डोसा करण्याची कृती
मुगाच्या डाळीचा डोसा करण्यासाठी सर्वप्रथम एक कप पिवळी मुगाची डाळ स्वच्छ धुवून किमान २ ते ३ तास पाण्यात भिजवून ठेवा. डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून टाका. आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, २ ते ३ हिरव्या मिरच्या, एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडं जिरं घालून त्याचे बारीक वाटण तयार करून घ्या. वाटताना पाण्याचा वापर कमीत कमी करा. जेणेकरून पीठ जास्त पातळ होणार नाही. तयार झालेलं पीठ एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.
यात चवीनसार मीठ, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद आणि बारीक केलेली ताजी कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. जर तुम्हाला हा डोसा अधिक पौष्टीक करायचा असाल तर चिरलेली ताजी कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करा. यात बारीक केलेला कांदा, किसलेलं गाजर किंवा शिमला मिरची देखील घालू शकता.
आता गॅसवर नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा. त्यात थोडं तेल किंवा तूप घालून ग्रीस करून घ्या. एक मोठा चमचा पीठ तव्याच्या मध्यभागी घालून ते गोलाकार फिरवत डोशाप्रमाणे परसरवून घ्या. डोश्याच्या कडेनं थोडं तेल सोडा आणि मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. खालची बाजू कुरकुरीत झाली की डोसा सावधपणे उलटवा. दुसऱ्या बाजूनंही १ ते २ मिनिटं व्यवस्थित शेकून घ्या. अशाप्रकारे गरमागरम पौष्टीक मुगाच्या डाळीचा डोसा तुम्ही पुदिन्याची चटणी, टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करू शकता.
