अळिवाच्या बियांमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. महिलांसाठी अळिवाचे लाडू ताकद देणारे मानले जातात. त्याचे फायदे महिलांसाठी जास्त आहेत. त्यामुळे महिलांसाठी हे लाडू शक्तीवर्धक आहे. अळिवाचे करताना मात्र काही चुका होतात. ज्यामुळे लाडू जास्त पातळ होतात किंवा त्याला लवकर विचित्र वास यायला लागतो. असे होऊ नये आणि लाडू करताना योग्य टेक्श्चर यावे यासाठी काही सोपे उपाय करणे महत्त्वाचे ठरते.
१. अळिवाची बिया काही तास पाण्यात किंवा दुधात भिजत ठेवल्यावर फुलतात. नंतरच त्या वापरता येतात. फुलल्यावर बिया चिकटसर होतात. तो चिकटपणा लाडू घट्ट होण्यासाठी मदत करतो. परंतु जर अळिव गरजेपेक्षा जास्त भिजवला तर मिश्रण खूप मऊसर होतं आणि लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत. त्यामुळे अळिवाला चार-पाच तासांपेक्षा जास्त भिजवू नये अळिवाच्या बिया भिजवल्यावर चार तासांनी तपासून पाहाव्यात.
२. लाडू करताना साखर किंवा गूळ घालायचा असेल तर तो व्यवस्थित पाक करून घ्यावा. गुळाचा पाक योग्य प्रमाणात तयार केला तरच लाडू घट्ट आणि टिकाऊ होतात. अति सैल पाक असेल तर लाडू चिकटसर राहतात आणि खूप मऊ होतात. त्याचबरोबर थोडी भाजलेली कणिक, खसखस, सुकामेवा, किसलेला नारळ यांचा समावेश केल्याने लाडू आणखी स्वादिष्ट लागतो आणि त्यात पोषणमूल्येही वाढतात.
३. अळिवाचे लाडू करताना तूप घरचेच वापरा. त्यामुळे चव जास्त छान येते. शिवाय तुपाला अप्रतिम सुगंध येतो. बदाम, काजू आणि इतरही ड्रायफ्रूट्स घातल्यास कुरकुरीतपणा येतो. लाडू घट्ट व्हावे यासाठी मिश्रण जरा कोमट झाल्यावरच लाडू वळावेत. गरम मिश्रणाचे वळले लाडू छान होत नाहीत. तसेच पूर्ण गार झाल्यावर ते घट्ट होते.
४. लाडू करण्याआधी अळिवाच्या बिया हलक्या भाजून घेतल्या तर त्याचा चिकटसरपणा जरा कमी होतो. अति चिकट राहत नाहीत. आणि लाडू मऊ होतो मात्र तुटत नाही. वळलेला आकार सोडत नाही. भाजल्याने त्याला छान खमंग वासही येतो आणि चवही छान लागते.