बिहारी स्टाइल चण्याची चटणी ही बिहारमधील एक पारंपरिक, साधी पण चवीला जबरदस्त अशी चटणी आहे. या चटणीला स्थानिक भाषेत अनेक ठिकाणी चना चटनी किंवा भुना चना की चटनी असे म्हटले जाते. ग्रामीण भागात ही चटणी रोजच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग असते, कारण ती कमी साहित्यात तयार होते, पोटभर होते आणि खूप पौष्टिकही असते. शिवाय स्वस्तही आहे.
या चटणीचा मुख्य भाग म्हणजे भाजलेले चणे किंवा हरभरे. बिहारमध्ये गॅस किंवा स्टोव्ह नसलेल्या काळातसुद्धा अंगणात, चुलीवर किंवा वाळूमध्ये चणे भाजून ही चटणी केली जात असे. त्यामुळे या चटणीला एक खास भाजलेला, थोडासा धुरकट असा स्वाद येतो, जो तिची ओळख बनला आहे. त्यामुळे गावांमध्ये हा पदार्थ करताना चुलीचा वापर केला जातो. यामध्ये फारसा मसाल्यांचा भडिमार नसतो, त्यामुळे चण्याची नैसर्गिक चव जाणवते. तसेच अगदी कमी साहित्यात करता येते. बिहारी घरांमध्ये ही चटणी प्रामुख्याने सत्तू पराठा, लिट्टी, भात, भाकरी किंवा रोटीबरोबर खाल्ली जाते. विशेषतः लिट्टी-चोखा सोबत ही चटणी केली जाते. उपवासानंतर किंवा नाश्त्यासाठीही अशी चटणी खाल्ली जाते.
साहित्य हरभरा, लसूण, आलं, हिरवी मिरची, आमचूर पूड, कोथिंबीर, मीठ, तेल, पाणी
कृती१. हरभरा म्हणजेच चणे रात्रभर भिजवायचे. काळे चणे वापरा तसेच हिरवेही वापरु शकता. चणे भिजल्यावर एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेलात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. त्यात लसणाच्या काही पाकळ्या सोलून घालायच्या. लसूण मिरची जरा छान परतून झाल्यावर त्यात चणे घालायचे. खमंग परतायचे. परतून झाल्यावर गार करायचे.
२. एका मिक्सरच्या भांड्यात हरभरा, हिरवी मिरची आणि लसूण घ्यायचे. त्यात कोथिंबीर घालायची. तसेच आल्याचा तुकडा घालायचा. नंतर चमचाभर आमचूर पूड घालायची आणि थोडे मीठही घालायचे. थोडे पाणी घालायचे आणि नंतर मिक्सरला चटणी वाटून घ्यायची. वरतून पुन्हा थोडे तेल घालायचे. भातासोबत, चपातीसोबत किंवा एखाद्या तळणीच्या पदार्थासोबत ही चटणी फारच मस्त लागते.
Web Summary : This Bihari-style black chickpea chutney is a simple, nutritious, and flavorful dish. Roasted chickpeas are ground with garlic, ginger, green chilies, amchur, and coriander. Enjoy it with rice, roti, or litti chokha for a taste of rural Bihar.
Web Summary : यह बिहारी शैली की काले चने की चटनी एक सरल, पौष्टिक और स्वादिष्ट व्यंजन है। भुने हुए चने को लहसुन, अदरक, हरी मिर्च, अमचूर और धनिया के साथ पीस लें। ग्रामीण बिहार के स्वाद के लिए इसे चावल, रोटी या लिट्टी चोखा के साथ परोसें।