पावसाळ्यात घशाला जसा चहा बरा वाटतो तसेच सूपही वाटते. रात्रीच्या जेवणाला जर गरमागरम सूप प्यायले तर समाधानही मिळते आणि पौष्टिकही खाल्ले जाते. त्यामुळे विविध प्रकारचे सूप करायला हरकत नाही. टोमॅटो, कोथिंबीर प्रमाणेच मस्त पालक-कॉर्न सूप एकदा करुन पाहा. फार पौष्टिक असते. तसेच करायला अगदी सोपे आहे.
साहित्य पालक, मक्याचे दाणे, पाणी, मीठ, काळिमिरी पूड, लसूण, आलं, कॉर्नफ्लावर, तेल, लिंबू, कोथिंबीर
कृती१. पालकाची छान ताजी जुडी घ्या. पालकाची पानं निवडायची आणि मग अगदी स्वच्छ धुवायची. पालक मीठाच्या पाण्यात दहा मिनिटे बुडवायचा म्हणजे तो छान स्वच्छ होतो. पालकाची पाने स्वच्छ झाल्यावर एका खोलगट भांड्यात काढून घ्यायची. त्यात मीठ घालायचे आणि उकळवायची. पालक उकळायला जास्त वेळ लागत नाही.
२. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. कोथिंबीरीची छान ताजी जुडी घ्यायची आणि निवडायची. कोथिंबीर बारीक चिरायची. तसेच मस्त टवटवीत मक्याचे दाणे घ्यायचे. छान गोडसर दाणेच घ्यायचे. पीलक शिजल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. गार झाल्यावर वाटून त्याची पेस्ट करायची. पालक कमी घ्यायचा. जास्त घेऊ नका.
३. एका खोलगट भांड्यात थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. म्हणजे चव जास्त छान लागते. त्यात मक्याचे दाणे घाला आणि थोडावेळ परता. मका छान परतला गेला की त्यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि परतून घ्या. मग त्यात पालकाची पेस्ट घाला आणि परतून घ्या. पालक परतल्यावर त्यात पाणी घाला आणि लिंबाचा रस घाला. ढवळून एक उकळी काढा. अगदी थोडे कॉर्नफ्लावर एका वाटीत घ्या. त्यात पाणी घाला आणि पेस्ट करा. ती पेस्ट सुपाच ओता. ढवळा आणि एकजीव करुन घ्या. त्यात चमचाभर काळीमिरी पूड घाला. चवी पुरते मीठ घाला आणि ढवळून घ्या. कॉर्नफ्लावर अगदी अर्धा चमचाच घ्यायचे. जास्त नाही. गरमागरम सूप पिऊन पाहा नक्कीच आवडेल.