दुधी भोपळा म्हटलं की लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही खायला नको म्हणतात. पण दुधी भोपळा आरोग्यासाठी फार फायद्याचा असतो. त्यामुळे आहारात त्याचा समावेश असावाच. दुधीचा हलवा चवीला मस्त लागतो पण मग तो पौष्टिक पदार्थ ठरत नाही. ( Make this amazing breakfast, you won't believe how delicious bottle gourd can be)लहान मुलांना दुधी भोपळा खायला घालायची एक जबरदस्त पद्धत जाणून घ्या. करायला अगदी सोपी अशी ही रेसिपी करुन पाहा. दुधीचा बन डोसा करा आणि पोटभर खा. चवीला मस्त लागतो आणि पौष्टिकही आहे. पाहा रेसिपी.
साहित्य
दुधी भोपळा, कोथिंबीर, काळे तीळ, हिरवी मिरची, आलं, मीठ , रवा, दही, तांदूळ पीठ, लिंबू, तूप, मोहरी, जिरे, हिंग, हळद
कृती
१. दुधी भोपळा सोलून घ्यायचा. सोलून झाल्यावर मस्त किसून घ्यायचा. कोथिंबीर बारीक चिरायची. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आलं किसून घ्यायचे किंवा मग मिरची आणि आल्याची पेस्ट तयार करायची.
२. एका खोलगट पातेल्यात किंवा वाडग्यात किसलेला दुधी भोपळा घ्यायचा. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तसेच हिरवी मिरची आणि किसलेले आलेही घालायचे. त्यात रवा घालायचा आणि तांदूळाचे पीठही घालायचे. मिक्स करायचे. नंतर त्यात दही घालायचे. दही घातल्यावर मस्त ढवळून घ्यायचे. मिश्रण जरा पातळ करायचे. अगदी पातळ नाही. जास्त दही वापरा. अगदीच घट्ट राहत असेल तरच थोडे पाणी घाला. झाकून ठेवा आणि दहा मिनिटे वाट पाहा.
३. नंतर पीठ फेटून घ्यायचे. फेटल्यावर त्यात चवीपुरते मीठ घालायचे. तसेच लिंबाचा रस घालायचा. काळे तीळ घालायचे. व्यवस्थित फेटायचे. गॅसवर फोडणी पात्र किंवा लहान कढई ठेवायची. त्यात थोडे तूप घालायचे. तुपात जिरे घालायचे. तसेच मोहरी घालायची. थोडे हिंग घालायचे आणि हळद घालायची. हळद घातल्यावर लगेच तयार केलेल्या मिश्रणाचा थर लावायचा. बन डोसा करताना लावता अगदी तसाच. बाजूने थोडे तूप सोडायचे. एका बाजूनी मस्त खमंग झाल्यावर उलटून दुसऱ्या बाजूनेही छान परतायचे. कुरकुरीत होते. मग काढून घ्यायचे. गरमागरम खायचे.
