चटणी हा पदार्थ भारतात जसा लोकप्रिय आहे तसाच इतरही काही देशांमध्ये लोकप्रिय आहे. प्रत्येक ठिकाणी नाव वेगळे रेसिपी वेगळी मात्र एखाद्या पदार्थासोबत काहीतरी खायला हवेच असते. मेक्सिकन पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातही फार लोकप्रिय आहेत. त्यापैकी एक म्हणजे सालसा सॉस. हा भाज्यांचा सॉस फार चविष्ट असतो. (Make the 'salsa sauce' at home in just 5 minutes, give Indian food a Mexican twist)सालसा म्हणजे सॉस किंवा चटणी अर्थ. मेक्सिकोमध्ये तो घराघरात सहज केला जाणारा आणि प्रत्येक देशात जरा वेगळ्या पद्धतीने केला जाणारा हा पदार्थ भारतीय चटणीप्रमाणेच आहे. पण त्याला खास तिखट- आंबट चव असते. सँण्डविच, नाचोज, सॅलेड, फ्राईज, भात आदी पदार्थांसोबत हा सॉस खाल्ला जातो. फक्त ब्रेडसोबतही खाल्ला जातो. पाहा सालसा करण्याची सोपी आणि चविष्ट पद्धत. झटपट करा, सगळेच आवडीने खातील.
हा पदार्थ तसा टोमॅटोच्या चटणीसारखाच लागतो. जरा थोडा फरक असतो. बाकी याला आपण टोमॅटोची चटणी म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. लहान मुलांना ही चटणी नक्की आवडेल. पाहा कसे करायचे.
साहित्य
टोमॅटो, लसूण, कांदा, सिमला मिरची, तेल, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लिंबू
कृती
१. टोमॅटोचे दोन तुकडे करायचे. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाले की त्यावर टोमॅटोचे तुकडे लावायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. त्याही त्यात घालायच्या. टोमॅटो मस्त परतला गेला की त्याची सालं काढून टाकायची. टोमॅटो कुस्करुन घ्यायचा. गार करत ठेवायचा.
२. सिमला मिरची बारीक चिरुन घ्यायची. तसेच कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. तसेच ताजी कोथिंबीर घ्यायची आणि निवडून घ्यायची. बारीक चिरायची. नंतर हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. एका खोलगट भांड्यात टोमॅटो बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, कोथिंबीर घ्यायची आणि मिक्स करायचे. त्यात लिंबू पिळायचा. चवीपुरते मीठ घालायचे. सालसा सॉस तयार होतो.
