काजूची भाजी ऐकायलाच एकदम भारी वाटतं. राजेशाही थाटाची भाजी असते. त्यामुळे विकत घ्यायला गेल्यावर किंवा हॉटेलमध्ये जाऊन खायचे म्हटल्यावर खिशाला कात्री लागलीच म्हणून समजा. काजूची रस्सा भाजी घरी करणे अगदीच सोपे आहे. (Make tasty cashew nut masala at home in a few minutes, you will love it)विकतपेक्षा चविष्ट होते. त्यामुळे नक्की करुन पाहा. काही मिनिटांत होते तसेच भात किंवा चपाती - भाकरी सगळ्याशी मस्त लागते.
साहित्य
काजू, पाणी, कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, तूप, गरम मसाला, हळद, लाल तिखट, धणे - जिरे पूड, जिरं, तमालपत्र, वेलची, काळिमीरी, मीठ
कृती
१. एका खोलगट पातेल्यात पाणी तापवायचे. त्यात काजू घालायचे. तसेच कांदा घालायचा. थोडी लसूण घालायची आणि आल्याचा तुकडा घालायचा. सगळे पदार्थ उकळवायचे. उकळल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. छान गार करायचे. गार झाल्यावर मिक्सरमधून वाटून पेस्ट तयार करायची. जास्त पातळ नको आणि घट्टही नको.
२. एका कढईत थोडे तूप घ्यायचे. त्यावर काजू परतून घ्यायचे. मस्त रंग बदलेपर्यंत परतायचे. काजू काढून अजून थोडे तूप घ्यायचे आणि त्यात जिरे घालायचे. मोहरी घालायची आणि तडतडू द्यायची. तमालपत्र घाला आणि वेलचीही घाला. तसेच काळिमिरी घालायची. नंतर कांदा बारीक चिरायचा. टोमॅटोही बारीक चिरायचा. कांदा गुलाबी परतून घ्यायचा आणि मग त्यात लाल तिखट घालायचे. धणे - जिरे पूडही घालायची. हळद घालायची. गरम मसाला घालायचा. सगळं छान परतायचं आणि मग त्यात तयार केलेली पेस्ट घालायची.
३. पेस्ट मस्त परतून घ्यायची. त्यात चवीनुसार मीठ घालायचे. एक वाफ काढायची आणि गरजेनुसार पाणी घालायचे. परतलेले काजू घालायचे आणि भाजी जरा आटू द्यायची, जरा घट्ट होऊ द्यायची. गरमागरम खायची. सोबत भात घ्या किंवा भाकरी - चपाती मस्तच लागते. पुरी असेल तर आणखी मजा येईल.
