नाश्त्यासाठी सतत काय वेगळे करायचे असा प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. रताळे सगळ्यांना आवडते असे नाही. मात्र रताळं फार पौष्टिक असते. (Make ragi and sweet potato dosa - the taste is so delicious that even those who don't like sweet potatoes will eat it wholeheartedly.)तसेच नाचणी, बाजरी, ज्वारी अशी पीठ आहारात असायलाच हवीत. काही सोप्या रेसिपी करुन हे पौष्टिक पदार्थ चविष्ट करता येतात. जसे की ही नाचणी-रताळ्याची रेसिपी. या मिश्रणाचे मस्त कुरकुरीत असे धिरडे तयार करता येते. हा पदार्थ नक्की करुन पाहा.
साहित्य
नाचणी, रवा, रताळे, हिरवी मिरची, आलं, लसूण, दही, कोथिंबीर, जिरं, लाल तिखट, हळद, मीठ, हिंग, पाणी, पांढरे तीळ
कृती
१. हिरव्या मिरचीचे तुकडे करा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. आल्याचा लहान तुकडा घ्या. रताळे स्वच्छ धुवायचे. त्याची सालं काढून घ्यायची आणि रताळ्याचा किस करुन घ्यायचा. एका मिक्सरच्या भांड्यात रताळ्याचा किस घ्यायचा. त्यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. आल्याचा लहान तुकडाही त्यात घाला. सारे एकत्र मस्त वाटून घ्या. वाटण्यासाठी त्यात पाणी घाला. मस्त पेस्ट तयार करायची.
२. एका खोलगट पातेल्यात रवा घ्यायचा. त्यात नाचणीचे पीठ घालायचे. जेवढा रवा तेवढीच नाचणी घ्यायची. त्यात तेवढेच दही घालायचे आणि मिश्रण ढवळून घ्यायचे. रताळ्याची तयार केलेली पेस्ट त्यात घाला आणि मग मसाले घाला. लाल तिखट घाला तसेच हळद घाला. हिंग घाला आणि थोडे पांढरे तीळ घाला. सारे पदार्थ एकत्र करा आणि ढवळून घ्या. छान मिक्स करा. थोडावेळ झाकून ठेवा.
३. कोथिंबीर छान बारीक चिरा आणि मिश्रणात घाला. सारे पदार्थ छान एकजीव झाल्यावर त्यात थोडे पाणी घाला आणि धिरड्यासाठी जसे पीठ भिजवता तसे पीठ करा. जास्त पातळ नको आणि अति घट्टही नको. गॅसवर तवा गरम करत ठेवा. तवा जरा तापल्यावर त्याला तेल लावा आणि त्यावर धिरडी लावा. मस्त जाडसर धिरडे दोन्ही बाजूनी खमंग आणि कुरकुरीत परतून घ्यायचे. एकदम मस्त लागते तसेच पौष्टिकही असते.