भेंडी ही लोकप्रिय व चविष्ट भाजी आहे. लहान मुले ते मोठी माणसे सगळ्यांनाच भेंडी आवडते. भेडीच्या विविध प्रकारच्या अनेक रेसिपी तयार करता येतात. त्यातीलच एक खास प्रकार म्हणजे बेसन भेंडी. (Make quick okra recipe , a crunchy treat for kids, tastes great and is easy to make)अगदी झटपट होणारी एकदम सोपी रेसिपी आहे. त्यामुळे एकदा नक्कीच करुन पाहा. भाजी म्हणून छान आहेच मात्र भातासोबत तोंडीलावणे म्हणूनही घेता येते.
साहित्य
भेंडी, बेसन, मीठ, जिरे पूड, कोथिंबीर, धणे पूड, गरम मसाला
१. भेंडी नीट धुवायची आणि कोरडी करून घ्यायची. पाणी राहिले तर भेंडी चिवट होते, म्हणून ती पूर्णपणे कोरडी करणे महत्त्वाचे असते. पुसून घेतल्यावर भेंडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे. मधोमध चिरायची आणि लांब काप ठेवायचे.
२. बेसनाचे पीठ खोलगट भांड्यात घ्यायचे. त्यात चमचाभर मीठ हळद आणि लाल तिखट घालायचे. पाणी घालून जरा पातळ असे पीठ तयार करायचे. जास्त पातळ नको मध्यम पातळ करायचे. त्यात भेंडीचे तुकडे घालायचे आणि जरा व्यवस्थित बुडवायचे. कोथिंबीर बारीक चिरायची. कोथिंबीरही त्यात घाला. त्यात थोडी जिरे पूड घाला. चमचाभर धणे पूड घाला. गरम मसाला घाला आणि मग मिश्रण एकजीव करुन घ्या.
३. कढईत तेल गरम करायचे. तेल जरा जास्त घ्यायचे. त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घाला. जिरे छान फुलू द्यायचे. मग हिंग घालून ढवळून घ्या. त्यात तयार मिश्रण घालायचे आणि भेंडी कुरकुीत होईपर्यंत परतायची. सतत ढवळायची म्हणजे बेसनही सगळीकडून शिजेल आणि कुरकुरीत होईल.
ही भाजी पोळी, भाकरी किंवा पराठ्यासोबत खायला एकदम छान लागते. दुपारच्या जेवणासाठी डब्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे. लहान मुलांना नक्की आवडेल. शिवाय करायला अगदी सोपी आहे. त्यात कांदा, लसूण असे पदार्थही घालू शकता. तसेच बेसन भिजवताना ताकातही भिजवले जाते. जरा आंबट लागते तरीही चव छान येते.