छोले हा पदार्थ भारतात फार लोकप्रिय आहे. छोले करायच्या विविध रेसिपी आहेत. त्यापैकी एक मस्त रेसिपी म्हणजे दह्यातील छोले. (Make instant curd chickpeas - delicious chole recipe you will love, must try )हा पदार्थ करायला फारच सोपा आहे. रेसिपी साधी- सिंपल आहे. मात्र साधी असली तरी अगदीच चविष्ट आहे. भातासोबत एकदा तरी असे छोले खाऊन पाहा. नक्की आवडतील.
साहित्य
काबुली चणे, दही, आलं, लसूण, काजू, धणे पूड, हळद, जिरे पूड, जिरे, लाल तिखट, टोमॅटो, कसूरी मेथी, कांदा, पाणी, कोथिंबीर, गरम मसाला, तेल, मीठ, हिरवी मिरची
कृती
१. एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू घ्यायचे. त्यात वाटीभर दही घालायचे. तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलून घालायच्या. आल्याचा तुकडा घालायचा. चमचाभर मीठ घालायचे आणि चमचाभर हळद घालायची. तसेच चमचाभर लाल तिखटही घालायचे. वाटून घ्यायचे.
२. कुकरमध्ये काबुली चणे घ्यायचे त्यात पाणी ओतायचे आणि कुकर लावायचा. चणे शिजवून घ्यायचे. जास्त मऊ न करता मध्यम शिजवायचे. कांदा गोलाकार चिरुन घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. टोमॅटोही बारीक चिरायचा.
३. एका कढईत थोडे तेल घ्या. त्यात जिरे घालायचे आणि मग तेलावर टोमॅटो परतायचा. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. तसेच चवी पुरते मीठ घालून चमचाभर लाल तिखट घालायचे. गरम मसाला घालायचा आणि धणे पूडही घालून घ्यायची. त्यात थोडी जिरे पूड घालायची आणि मस्त ढवळायचे. टोमॅटो छान शिजल्यावर त्यात कांदा घाला. कांदा मस्त शिजला की त्यात तयार केलेली पेस्ट घालायची आणि एक वाफ काढून घ्यायची.
४. मसाला छान एकजीव झाल्यावर त्यात चणे घालायचे आणि ढवळायचे. आणखी एक वाफ काढून घ्यायची. भाजी ढवळायची त्यात पाणी घालायचे. गरजेपुरतेच घाला. अति पाणी नको. भाजी पाणचट लागेल. तसेच त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्यात हातावर मळलेली कसुरी मेथी घाला आणि भाजी उकळू द्या. दह्यातले छोले भातासोबत एकदम मस्त लागतात.
