दोडकं म्हणजे फार नावडीची भाजी. लहानच काय तर मोठेही खाताना नखरे करतात. चवच आवडत नाही, मिळमिळीत लागते. मात्र दोडक्यात जीवनसत्व सी, ए, बी असते. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम व फायबरही असते. हे पचायला हलके, शरीर शुद्ध करणारे व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक आहेत. (make dodka like this, everyone will love it, easy and tasty recipes )लहान मुलांनी दोडकं खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे मिळतात. पचन सुधारते, उष्णतेचा त्रास कमी होतो आणि वाढीसाठी आवश्यक पोषण सहज मिळते. लहान मुलांना दोडकं खायला देणे या रेसिपीमुळे अगदी सोपे होईल. पाहा दोडक्याचा मस्त पदार्थ.
साहित्य
दोडके, जिरं, कोथिंबीर, गरम मसाला, रवा, मीठ, हळद, लाल तिखट, बेसन, कणीक, तूप, मक्याचे दाणे, चीज, टोमॅटो सॉस
कृती
१. दोडकं सोलून घ्या. सालं काढल्यावर धुवायचे नंतर मस्त किसून घ्यायचे. कोथिंबीरीची ताजी जुडी निवडून घ्यायची. मस्त स्वच्छ धुवायची. धुतल्यावर बारीक चिरुन घ्यायची. मक्याचे दाणे उकडून घ्यायचे. उकडताना त्यात मीठ घालायचे.
२. एका परातीत किसलेले दोडके घ्यायचे. त्यात कोथिंबीर घालायची. तसेच चमचाभर लाल तिखट घालायचे. चमचाभर गरम मसाला घालायचा आणि चमचाभर हळद घालायची.थोडे बेसनाचे पीठ घालायचे. छान मिक्स करायचे. थोडे गव्हाचे पीठ म्हणजेच कणीक घालायची आणि रवाही घालायचा. थोडे जिरे घाला आणि मग सारे पदार्थ छान एकजीव करुन घ्या. मिश्रण तयार करताना त्यात अगदी थोडे पाणी घाला. थोडावेळ पीठ झाकून ठेवा म्हणजे रवा छान फुलेल.
३. तव्यावर थोडं तूप घाला. तुपावर तयार पिठाचे जाडसर घट्ट असे गोल लावायचे. लहानच करा मोठे नको. एका बाजूने परतून झाल्यावर पलटून घ्या. शिजलेल्या बाजूला थोडा टोमॅटो सॉस लावा आणि त्यावर उकडलेले मक्याचे दाणे आणि चीज ठेवा. दोन्ही टोके एकमेकांना जोडून करंजीसारखा आकार द्या. चीज जरा विरघळले आणि पदार्थ खमंग परतला गेला की ताटात काढून घ्या. गरमागरम खा.