अनेक घरात रोजच पोळी उरलेली असते. पण ती फेकून देण्यापेक्षा तिच्यापासून छान चविष्ट पदार्थ करता येतात. त्यामुळे अन्न वाया जात नाही आणि झटपट काहीतरी तयार करताही येते. तसेच हे पदार्थ फक्त काम चलाऊ नसतात तर चवीला छान असतात. उरलेल्या पोळीपासून फोडणीची पोळी हा सर्वात सोपा आणि स्वादिष्ट पदार्थ करता येतो.(Make delicious crispy chips from leftover rotis in ten minutes -amazing recipe) तेल, मोहरी, हळद, कढीपत्ता, मिरची, कांदा घालून पोळीचे तुकडे परतले की मस्त फोडणीची पोळी तयार होते. फोडणीची पोळी करण्यासाठी खास दोन पोळ्या जास्तही लाटल्या जातात एवढा लोकप्रिय असा हा प्रकार आहे.
पोळीचे लाडू हा दुसरा गोड प्रकार आहे जो घरोघरी केला जातो. पोळीचे तुकडे करून त्यात गूळ, साजूक तूप आणि वेलची घालून लाडू केला की गोड आणि पौष्टिक पदार्थ तयार होतो. याशिवाय पोळीचे चिप्स म्हणजेच पोळीचे कुरकुरीत तुकडे भाजून तयार करता येतात. काही जण उरलेल्या पोळीचा पोळी रोल किंवा पोळी सँडविच करतात. पोळीमध्ये भाजी, चीज किंवा चटणी भरुन गुंडाळली की मुलांनाही आवडते. पोळीचे चिप्स किंवा पापड नावे अनेक आहेत मात्र पदार्थ एकदम सोपा आणि चविष्ट आहे. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य
पोळी, तेल, मीठ, लाल तिखट, चाट मसाला
कृती
१. शिळी पोळी घ्यायची. तिचे चौकोनी तुकडे करायचे. चौकोनी नाही केले तरी चालेल पण जरा मोठे तुकडे करा. जे तळता येतील. तेल गरम करत ठेवायचे. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यात एक-एक करुन पोळीचा तुकडा सोडा आणि मस्त खमंग कुरकुरीत तळून घ्या.
२. एका खोलगट भांड्यात तळलेले तुकडे घ्यायचे. जरा गार होऊ द्यायचे. गार झााल्यावर ते पापडासारखे कुरकुरीत होतात. तळताना लक्षात ठेवा की ते लगेच तळले जातात. जास्त वेळ तळले तर ते करपतात. गार झाल्यावर त्यात चमचाभर मीठ, थोडे लाल तिखट आणि थोडा चाट मसाला घाला. चाट मसाला खारट असतो. त्यामुळे मीठाचे आणि मसाल्याचे प्रमाण नीट घ्यायचे. वर एक ताटली ठेवा आणि पातेलं हलवा. मसाला सगळ्या तुकड्यांना लागेल याची काळजी घ्यायची.