उरलेल्या भाताची भजी हा चमचमीत चवीचा एक अप्रतिम आणि भारी प्रकार आहे. अनेकदा रात्रीचा भात उरतो आणि सकाळी तो कोरडा होतो. अशा वेळी तो फेकून न देता भजी करुन खाल्ल्यास एक स्वादिष्ट नाश्ता तयार होतो. (Make crispy bhajis with leftover rice, easy and tasty recipe, must try )ही भजी बाहेरुन खमंग आणि कुरकुरीत असते तर आतून मऊ लागते. चहासोबत, सॉसबरोबर किंवा दह्यासोबत खायचे. उरलेल्या भाताचा असा उपयोग केल्याने अन्नाची नासाडी होत नाही आणि रोजच्या नाश्त्यात नवीनपणा येतो. शिळ्या भाताचे विविध पदार्थ तुम्ही करतच असाल. एकदा हा पदार्थही करुन पाहा.
साहित्य
भात, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, बेसन, तांदूळाचे पीठ, बेकींग सोडा, तेल, हळद, लाल तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, पाणी
कृती
१. शिळा भात मोकळा करुन घ्यायचा. त्यात थोडे पाणी ओतायचे आणि भात झाकून ठेवायचा. पाणी अगदी थोडे घ्यायचे. जास्त नाही. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच आल्याचा लहान तुकडा घ्यायचा. तिन्ही पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा.
२. कांदा सोलून घ्यायचा. नंतर मस्त बारीक चिरायचा. भातातील पाणी काढायचे आणि त्यात आलं-मिरची-लसूण पेस्ट घालायची. तसेच त्यात बारीक चिरलेला कांदाही घालायचा आणि मिक्स करायचे. मिक्स केल्यावर त्यात दोन - चार मोठे चमचे बेसन घालायचे. त्यात चमचाभर तांदूळाचे पीठ घालायचे. चमचाभर हळद घाला. तसेच चमचाभर लाल तिखट घाला आणि मिक्स करुन घ्या. चमचाभर धणे-जिरे पूड घाला आणि चवी पुरते मीठ घालायचे. सारे एकजीव करायचे.
३. त्यात अगदी थोडा बेकींग सोडा घालायचा. कांदा भजीसाठी जसे मिश्रण तयार करता तसे जरा घट्ट असे पीठ तयार करुन घ्यायचे. गॅसवर तेल तापत ठेवायचे. तेल मस्त गरम झाल्यावर त्यात एकएक करुन भजी सोडायची. छान खमंग तळायची. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत झाल्यावर काढून घ्यायची. तेल निथळू द्यायचे आणि गरमागरम खायची.