पेपर डोसा हा भारतातील अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ आहे. सर्वांनाच असा डोसा आवडतो, हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. डोश्याचे अनेक प्रकार असतात. त्यापैकीच कुरकुरीत प्रकार म्हणजे पेपर डोसा. हा डोसा पातळ, सोनेरी आणि कुरकुरीत असतो. भारतातील तसेच भारता बाहेरील तो खवय्यांचा आवडता नाश्ता ठरला आहे. पण हॉटेलमध्ये मिळणारा डोसा जितका कुरकुरीत असतो, तितका घरच्या घरी करणे अनेकांना अवघड जाते. मात्र काही सोप्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तो तितकाच चविष्ट आणि खमंग तयार होतो. घरी विकतसारखा मोठा आणि कुरकुरीत डोसा करण्यासाठी टिप्स पाहा.
सर्वप्रथम डोश्याचे पीठ योग्य प्रमाणात तयार करणे महत्त्वाचे असते. ते ना फार घट्ट असावे, ना फार पातळ. गुठळ्या नसलेले पीठ तयार केल्यास डोसा हलका व कुरकुरीत होतो. पीठ तयार करताना जरा घट्ट करायचे. नंतर ते फेटून जरा पातळ करायचे. म्हणजे अगदी योग्य प्रमाणात पीठ तयार होते. त्यात थोडा रवा किंवा तांदूळाचे पीठ घातल्यास अधिक खुसखुशीतपणा डोश्याला येतो. पीठ आंबवणेही आवश्यक आहे. इंस्टंट डोसा चवीला जरी छान लागला तरी पेपर डोसा करण्यासाठी व्यवस्थित आंबवलेले पिठंच लागते. नीट आंबवलेले पिठच डोश्याला हवा तो फुगवटा आणि तांबूस रंग देते. कमीतकमी आठ ते दहा तास आंबवण्यासाठी ठेवल्यास त्याचा स्वादही वाढतो.
तवा गरम आणि स्वच्छ असावा. तव्यावर जास्त तेल लावल्यास डोसा सुटेल आणि कुरकुरीत होईल असे जर वाटत असेल तर तसे नसून कमी तेलावर करा. नॉनस्टिकी तवा वापरा आणि तेल कमी लावा. फक्त हलक्या हाताने तेलाचा पातळ थर लावावा. पीठ घातल्यानंतर त्वरित गोलाकारात पसरवा आणि थर शक्य तितका पातळ ठेवा. हा बारीक थरच पेपर डोश्याला कुरकुरीत करतो. डोसा मध्यम आचेवरच करावा, कारण जास्त आचेवर तो करपतो आणि आतून कच्चा राहतो आणि कुरकुरीत होत नाही.
या छोट्या पण उपयुक्त गोष्टी पाळल्यास घरच्या घरीही रेस्टॉरंटसारखा पेपर डोसा सहज तयार होतो. कुरकुरीत, तांबूस आणि हलका पेपर डोसा म्हणजे खवय्यांसाठी खरी मेजवानीच! भारतात हा पदार्थ केवळ नाश्त्यापुरता मर्यादित नाही, तर आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य आणि स्वादिष्ट भाग आहे.
