बाजारातील पाव मऊ आणि फुललेला दिसावा यासाठी त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्ज, अॅडिटिव्ह्ज किंवा जास्त प्रमाणात यीस्ट वापरले जाते. त्यामुळे तो जास्त दिवस टिकतो, पण आरोग्यासाठी ते घटक नेहमीच चांगले असतील असे नाही. घरी पाव करताना मात्र आपण वापरणारे पीठ, तेल किंवा बटर, मीठ आणि इतर साहित्य यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतो. गव्हाचे पीठ, मल्टीग्रेन किंवा कमी मीठ-साखरेचा पर्याय निवडता येतो. त्यामुळे घरचा पाव अधिक पौष्टिक आणि पचायला हलका असतो. वडापाव, पावभाजी, दाबेली, मिसळपाव आदी पदार्थ घरी वरचेवर केलेच जातात. त्यामुळे पुढच्यावेळी पावही घरीच करा. पाहा सोपी पद्धत.
साहित्य साखर, यीस्ट, पाणी, मैदा, मीठ, बटर, दूध
कृती१. एका वाडग्यात थोडी साखर घ्यायची. त्यात गरम पाणी घालायचे आणि थोडे यीस्ट घालायचे. ढवळून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे. सेट होऊ द्यायचे. यीस्ट अॅक्टिव्ह व्हायला १५ ते २० मिनिटे लागतात. ते झाल्यावर पुन्हा मस्त ढवळून घ्यायचे. नंतर एका परातीत मैदा घ्यायचा. त्यात वितळवलेले बटर घालायचे. पीठ आणि बटर एकजीव करायचे.
२. मैद्यात यीस्टची पेस्ट घालायची. मीठ घालायचे आणि दूध घालायचे. कणिक जशी मळता तसेच पीठ मळून घ्यायचे. पाण्याऐवजी दूध वापरणे जास्त फायद्याचे ठरते. कारण मऊपणा आणि चव दुधामुळे जास्त छान येते. पीठ सेट करत ठेवायचे.
३. हाताने पीठ चांगलेच तेंबून घ्यायचे. तेंबून झाल्यावर त्याला थोडे बटर लावायचे आणि पुन्हा सेट करायचे. तासाभरात पीठ फुलून दुप्पट होते. मग त्याचे लहान गोल करायचे आणि आतल्या बाजूला दुमडून ते बटर पेपरवर ठेवायचे. कुकरमध्ये मीठ घ्यायचे आणि त्यावर ताटली ठेवायची.
४. ताटलीत बटर पेपरवर ठेवलेले पाव कुकरमध्ये ठेवायचे. कुकर लावायचा आणि ४० मिनिटे मंद आचेवर पाव शिजवायचे. नंतर गार झाल्यावर कट करुन घ्यायचे. अगदी विकतसारखेच होतात.
Web Summary : Make soft, preservative-free pav at home using a cooker instead of an oven. This recipe allows control over ingredients, offering a healthier, tastier alternative to store-bought pav for your favorite dishes.
Web Summary : ओवन के बजाय कुकर का उपयोग करके घर पर नरम, बिना प्रिजर्वेटिव वाला पाव बनाएं। यह नुस्खा सामग्री पर नियंत्रण रखने की अनुमति देता है, जो आपकी पसंदीदा डिश के लिए स्टोर से खरीदे गए पाव का एक स्वस्थ, स्वादिष्ट विकल्प है।