काही तरी वेगळे पदार्थ करायची लहर अधूनमधून येते. पण मग काय करायचे हा प्रश्न असतोच. अशा वेळी करण्यासाठी अगदी सोपा आणि योग्य असा पदार्थ म्हणजे मुटकुळे. मेथीचे मुटकुळे केले जातात. ते अगदी चविष्ट असतात. त्याप्रमाणे कोथिंबीरीचेही करता येतात. (Make a special meal for the evening: coriander recipe, crispy dish for children )मुटकुळे वाफवल्यावर तळले जातात. मात्र तुम्ही ते तळण्याऐवजी कमी तेलात फक्त फ्राय केले तर त्याची चव छान लागतेच आणि ते पौष्टिकही राहतात. पाहा मस्त रेसिपी.
साहित्य
गव्हाचे पीठ, बेसन, बाजरी पीठ, मीठ, कोथिंबीर, पाणी, तेल हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, आलं, लसूण, पांढरे तीळ
कृती
१. कोथिंबीरीची छान ताजी जुडी घेऊन या. निवडून घ्या आणि कोथिंबीर स्वच्छ धुवायची. बारीक चिरायची. मस्त भरपूर कोथिंबीर घ्या. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा तुकडा घ्यायचा. आलं-लसूण-हिरवी मिरची अशी पेस्ट करायची.
२. एका परातीत गव्हाचे पीठ घ्यायचे. जर गव्हाचे पीठ वाटीभर घेत असाल तर त्यात वाटीभर बाजरीचे पीठही घालायचे. तसेच अर्धी वाटी बेसन घालायचे. त्यात चवी पुरते मीठ घाला. तसेच चमचाभर हळद घाला आणि थोडे पांढरे तीळही घाला. लाल तिखट घाला आणि मिक्स करुन घ्या.
३. सगळे पदार्थ छान एकजीव करायचे. पिठं एकजीव झाल्यावर त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट घालायची. भरपूर कोथिंबीर घालायची. नंतर त्यात हळूहळू पाणी घालायचे आणि पीठ मळायचे. जरा मऊ आणि सैल पीठ मळायचे. त्याला थोडे तेल लावायचे.
४. घरी जर मोदक किंवा इडली पात्र असेल तर ते वापरा आणि जर ते नसेल तर एका पातेल्यात पाणी घ्या त्यावर जाळी ठेवा आणि मग त्यात मुटकुळे वाफवा. मुटकुळे करण्यासाठी हाताला तेल लावा आणि पिठाचा अगदी लहान भाग उचलून त्याला हाताने आकार द्या. पात्राला तेल लावा पाणी उकळल्यावर त्यावर एकेक करुन मुटकुळे लावा. झाकण ठेवा आणि वाफवून घ्या. मस्त वाफवून घ्या. नंतर एका कढईत तेल घ्या आणि तेल तापल्यावर त्यात मुटकुळे तळायचे. जर तुम्हाला तळाचे नसतील तर तेलावर परतून घ्या. परतलेलेही मस्त लागतात.