युपी बिहारसारख्या ठिकाणी थंडीच्या दिवसांत नाश्त्यासाठी मस्त चविष्ट पदार्थ केले जातात. त्यापैकी एक एकदम मस्त असा पदार्थ म्हणजे दाल फरा. कधी खाल्ला नसेल तर नक्कीच खा. करायला अगदी सोपा असतो. (Make a delicious dal stufed semolina recipe, eat it with tea, wonderful recipe, children will love it )शिवाय पौष्टिकही असतो. सारण आणि पीठ दोन्ही एकदम पौष्टिक आणि चविष्ट असते. करायला वेळही अगदी कमी लागतो. लहान मुलांसाठी डब्यात द्यायलाही हा पदार्थ एकदम मस्त आहे. पाहा कसा करायचा.
साहित्य
रवा, मीठ, पाणी, तेल, पाणी, चणाडाळ, हिरवी मिरची, लसूण, जिरे, हळद, चाट मसाला, कोथिंबीर, गरम मसाला, मोहरी, हिंग, कडीपत्ता, आलं, काळिमीरी, लाल तिखट
कृती
१. एका परातीत रवा घ्यायचा. त्यात चमचाभर मीठ घालायचे. तसेच पाणी घालून मस्त पीठ मळायचे. पोळीसाठी जसे पीठ मळता अगदी तसेच मळायचे. पीठ मळून झाल्यावर त्याला तेल लावायचे आणि थोडावेळ झाकून ठेवायचे.
२. चणाडाळ तीन तासांसाठी भिजत ठेवायची. नंतर त्यातून पाणी काढून टाकायचे. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. तसेच थोडे जिरे घालायचे. थोडी काळीमिरी घालायची. लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. आल्याचा लहान तुकडा घालायचा. डाळ वाटून घ्यायची. जाडसरच वाटायची जास्त लगदा करायचा नाही. जरा घट्टच राहू द्यायची. नंतर त्यात चवी पुरते मीठ घालायचे. चमचाभर हळद घालायची. चमचाभर चाट मसालाही घालायचा. तसेच हिंग आणि लाल तिखटही घालायचे. गरम मसाला घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करायचे.
३. मळलेल्या पीठाच्या पोळ्या लाटायच्या. जास्त पातळ नको जरा जाडसरच लाटा. नंतर त्याचे लहान गोल तयार करा. त्यामध्ये डाळीचे सारण भरायचे आणि त्याला टाकोज सारखा आकार द्यायचा. सगळे तयार करुन झाले की वाफवून घ्यायचे. त्यासाठी इडलीपात्र किंवा कुकरही वापरता येतो. मस्त वाफवायचे. नीट शिजले की काढून घ्यायचे.
४. एका पॅनमध्ये किंवा कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात चमचाभर मोहरी घालायची. तसेच कडीपत्ता घालायचा. चमचाभर जिरे घालायचे. थोडे हिंगही घाला आणि फोडणी छान परतून घ्यायची. त्यात वाफवलेले दाल फरा घालायचे आणि खमंग परतून घ्यायचे. सॉस किंवा चटणीसोबत खायचे.
