मकर संक्रांत (Makar Sankranti 2026) म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे तीळ आणि गूळ वापरून केलेले पदार्थ. या काळात थंडी असल्यामुळे शरीराला उष्णता देण्यासाठी तीळ आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. चविष्ट आणि कुरकुरीत तिळाची चिक्की घरी करणं एकदम सोपं आहे. तीळ गुळाची चिक्की करण्यासाठी तुम्हाला तीळ आणि गूळ या २ घटकांची आवश्यता असेल. (Tilgul Chikki Recipe)
तिळाची चिक्की कशी करायची?
चिक्की करण्यासाठी एक वाटी पांढरे तीळ, पाऊण ते एक वाटी किसलेला गूळ आणि एक चमचा साजूक तूप घ्या. सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करून त्यात तीळ मंद आचेवर हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. तीळ जास्त भाजले तर ते कडवट लागतात त्यामुळे ते फक्त कुरकुरी होतील याची काळजी घ्या. भाजलेले तीळ एका ताटात काढून घ्या.
पाक तयार करण्याची सोपी कृती
आता त्याच कढईत एक चमचा तूप घालून त्यात किसलेला गूळ घाला. गूळ मंद आचेवर सतत हलवत राहा. गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही ते पाहण्यासाठी एका वाटीत थोडं पाणी घेऊन त्यात गुळाचे काही थेंब घाला. जर गुळाची गोळी कडक झाली तर ती ताटावर पडल्यास आवाज आला तर समजावे की पाक तयार आहे. या पाकात चिमूटभर वेलची पूड किंवा सुंठ पावडर घातल्यास चव अधिक छान लागते.
चिक्की सेट करणं
पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेले तीळ घालून पटापट एकजीव करा. हे मिश्रण गरम असतानाच तूप लाववलेल्या पोळपाटावर किंवा ताटावर काढा. लाटण्याला थोडं तूप लावून मिश्रण पातळ लाटून घ्या. मिश्रण गरम असतानाच चाकूनं त्याच्या हव्या त्या आकारात वड्या पाडून ठेवाव्यात. पूर्णपणे थंड झाल्यावर या वड्या आपोआप सुटतात. अशा प्रकारे घरच्याघरी तयार झालेली ही चिक्की हवाबंद डब्यात भरून ठेवा. ही चिक्की पौष्टीक तितकीच चवदारही लागते. जी तुम्ही कधीही खाऊ शकता.
