संक्रांत जवळ (Makar Sankranti 2025) आली की घराघरातून तिळाचा खमंग सुगंध यायला सुरूवात होते. पण अनेकदा गृहिणींची तक्रार असते की तिळाचे लाडू खूपच कडक होतात किंवा लाडू व्यवस्थित वळताच येत नाहीत. तिळाचे लाडू चवीला स्वादीष्ट आणि जास्त कडक होऊ नयेत यासाठी लाडू करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. (How To Make Til Ladoo)
मऊ आणि परफेक्ट तिळाचे लाडू करण्यासाठी काही सोप्या टिप्स
1) मऊ लाडूसाठी साध्या गुळाऐवजी चिक्कीचा गूळ वापरणं टाळा. चिक्कीचा गूळ प्रामुख्यानं कडक चिक्कीसाठी असतो. लाडू मऊ हवे असतील तर साधा सेंद्रीय गूळ किंवा केमिकल विरहित पिवळा गूळ वापरावा तसंच तीळ स्वच्छ निवडून घ्यावेत.
2) तीळ भाजताना घाई करू नका. मंद आचेवर तीळ गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. तीळ जास्त भाजले तर लाडू कडू लागतात आणि कमी भाजले तर चिवट लागतात. तीळ छान फुले की ते एका ताटात काढून पूर्णपणे गार होऊ द्या.
3) लाडू कडक होण्याचं कारण म्हणजे गुळाचा पाक जास्त पक्का होणं. एका कढईत थोडं तूप घालून त्याच चिरलेला गूळ घाला. गूळ विरघळला की त्याला फेस येईल. त्यावेळी एका वाटीत पाणी घेऊन त्याच गुळाचे २ थेंब घाला. जर त्या थेंबाची मऊ गोळी तयार झाली तर समाज की पाक तयार आहे. जर गोळी कडक झाली किंवा तिचा आवाज झाला तर तर लाडू कडक होतात. त्यामुळे गोळी मऊ असतानाच गॅस बंद करावा.
4) लाडू केवळ मऊच नाही तर खुसखुशीत होण्यासाठी एक चिमूटभर खाण्याचा सोडा किंवा एक चमचा साजूक तूप घाला. यामुळे लाडूला चकाकी येते आणि ते दाताला चिकटत नाही. तसंच दाण्याचा कूट जाडसर असावा ज्यामुळे लाडूला चांगली चव येते.
५) मिश्रण गरम असतानाच लाडू वळावे लागतात. हात भाजू नये म्हणून हाताला थोडं पाणी किंवा तूप लावा. जर मिश्रण हाताला जास्त चटके देत असेल तर चमच्यानं त्याचे छोटे छोटे भाग ताटात काढून ठेवा आणि थोडं कोमट झालं की पटकन वळून घ्यावेत.
