भारतात मुख्य पदार्थ जेवढे खास आहेत तसेच तोंडीलावणेही आहे. अनेक प्रकारच्या चटण्या, लोणची, कोशिंबीर केल्या जातात. उजवी बाजू जरी मोजकीच भरली तरी पानाची डावी बाजू अगदी विविधतेने नटलेली दिसायला हवी. फक्त चटण्यांचेच किती प्रकार आहेत मोजावेच लागेल. (Maharashtrian Chutney: Eat sour and sweet chutney, it reduces health problems, it tastes good, must try recipe)शिवाय घरोघरी आणि गावागावातून पदार्थ करायची पद्धत वेगळीच. नारळ, कांदा, लसूण, कोथिंबीर असे विविध पदार्थ वापरुन चटणी केली जाते. अशीच एक मस्त चटणी म्हणजे आमसुलाची. फार जणांना याबद्दल माहितीही नसते. पण ही आंबट-गोड चटणी अगदी चविष्ट असते. पाहा कशी करायची. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्कीच आवडेल.
साहित्य आमसुल, मीठ, साखर, नारळ, हिरवी मिरची, आलं, पाणी, हिंग, कोथिंबीर, जिरं, कडीपत्ता, तेल
कृती१. छान ताजा नारळ घ्यायचा. नारळ फोडायचा आणि खवायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. तसेच आल्याचाही लहान तुकडा घ्यायचा. कोथिंबीरीची ताजी मस्त जुडी घ्यायची. कोथिंबीर निवडायची आणि मग बारीक चिरुन घ्यायची.
२. एका मिक्सरच्या भांड्यात खवलेला नारळ घ्यायचा. त्यात ददोन चमचे साखर घालायची. तसेच आल्याचा तुकडा घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे आणि थोडे जिरे घ्यायचे. वाटीभर नारळ असेल तर आमसुल चार ते पाच घ्यायचे. हेच प्रमाण चटणी करताना ठेवायचे. अगदी किंचित पाणी घालून चटणी वाटून घ्यायची. जरा जास्त वेळ वाटायला लागते. या चटणीला जास्त पाणी घालून चालत नाही. पाणी जास्त झाले तर आमसुलाचा सारा अर्क पाण्यात उतरतो आणि चटणी बेचव लागते. तयार चटणी खोलगट वाडग्यात काढून घ्या.
३. एका फोडणीपात्रात दोन चमचे तेल घ्यायचे. गरम करायचे. गरम तेलात कडीपत्ता घालायचा. तसेच जिरे घालायचे. जिरं छान फुललं की त्यात हिंग घाला आणि फोडणी खमंग करुन घ्या. फोडणी घातली की बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घाला. चवीनुसार मीठ घाला. चटणी मस्त ढवळून घ्यायची. एकजीव करुन घ्यायची.