कढी करायच्या अनेक पद्धती आहेत. भातासोबत कढी करताना एकदा या पद्धतीने नक्की करुन पाहा. चवीला एकदम मस्त आहे. (Maharashtra monsoon food:a black gram curry with authentic traditional taste, see the recipe, easy recipes )तसेच काळे चणे पौष्टिक असतात. त्यामुळे आरोग्यासाठी ही कढी छान आहे.
साहित्य
काळे चणे, बेसन, तेल, मोहरी, हिरवी मिरची, मोहरी, हिंग, पाणी, हळद, कडीपत्ता, दही, लसूण, लाल तिखट, जिरे, मीठ
कृती
१. काळे चणे रात्रभर भिजवायचे. सकाळी कुकरला लावायचे आणि शिजवून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. बारीक चिरली तरी चालेल. कांदा घालू शकता. नाही घातला तरी चालेल. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. सोलून झाल्यावर ठेचून घ्या. छान घरचे दही घ्यायचे. घरचे नसेल तर विकतचे वापरा. मात्र घरच्या दह्याची कढी जास्त चविष्ट होते.
२. दह्यात दोन ते तीन चमचे बेसन घालायचे आणि ढवळायचे. बेसन जास्त घालू नका. कमीच घालायचे नाहीतर बेसन जास्त होईल आणि कढी एकदम घट्ट होईल. बेसन घातल्यावर दह्यात पाणी घालायचे आणि त्याचे ताक घुसळून घ्यायचे. बेसनाचे गोळे राहणार नाही याची काळजी घ्यायची. त्यात चमचाभर हळद घालायची.
३. गॅसवर कढई किंवा खोलगट पातेल गरम करत ठेवा. त्यात तेल घालायचे आणि तेल जरा तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घालायचे. जिरे मस्त फुलेल मग त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता छान परतून घ्यायचा. कडीपत्ता भरपूर वापरायचा. म्हणजे कढीला वास आणि चवही मस्त येते. कडीपत्ता परतल्यावर त्यात थोडे हिंग घालायचे. हिंगाचा वास मस्त येतो आणि कढी अजिबात बाधत नाही.
४. फोडणीमधे ठेचलेली लसूण घाला आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे तसेच चमचाभर लाल तिखट घाला आणि परतून घ्या. हळद बेसनाच्या मिश्रणात घातली नसेल तर फोडणीत घालायची. सगळ्यात शेवटी चमचाभर मीठ घाला आणि बेसन लावलेले ताक त्यात ओता. छान ढवळून घ्या. कढी व्यवस्थित उकळवायची. मग त्यात गरजे पुरते पाणी आणि मीठ घालायचे. शिजवलेले काळे चणे त्यात घालायचे आणि एक वाफ काढून घ्यायची. मस्त गरमागरम कढी आणि गरम भाताची मेजवानी पावसाळ्यात खायलाच हवी.