सकाळी नाश्त्याला काय करावे हा गृहिणींना नेहमीच सतावणारा प्रश्न! उपमा, पोहे, उकड, इडली, डोसा, अप्पे आपण करतोच. त्याच यादीत समाविष्ट करा हा पदार्थ. ही रेसिपी मूळची आहे कर्नाटकातली! आपण भाजणीचे थालीपीठ करतो, तसे तिथे तांदळाच्या बारीक कण्यांचे किंवा तर रव्याचे थालीपीठ केले जाते. ओलं खोबरं आणि दह्यामुळे हे थालीपीठ अतिशय मऊ आणि चविष्ट होते. रात्री नारळ खवून फ्रिजमध्ये खोबरे ठेवले तर सकाळच्या गडबडीच्या वेळी इतर जिन्नसांची जुळवाजुळव करून हे खमंग थालीपीठ झटपट तयार करता येईल.
साहित्य
रवा: १ कप (बारीक किंवा जाड कोणताही चालेल)
कांदा: १ मध्यम (बारीक चिरलेला)
ओलं खोबरं: २-३ मोठे चमचे (खोवलेले)
हिरवी मिरची: २-३ (बारीक चिरलेली किंवा ठेचा)
कोथिंबीर: अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
दही: २-३ मोठे चमचे (ताजे)
मीठ: चवीनुसार
तेल/तूप: थालीपीठ भाजण्यासाठी
पाणी: गरजेनुसार
कृती :
एका मोठ्या बाऊलमध्ये रवा घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि दही घाला. हे सर्व साहित्य आधी कोरडेच व्यवस्थित मिसळून घ्या.
आता यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम सरबरीत पीठ भिजवा. (पीठ जास्त घट्ट नसावे आणि जास्त पातळही नसावे). रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे पीठ भिजवल्यावर १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. यामुळे रवा छान फुलेल आणि थालीपीठ मऊ होतील.
१५ मिनिटांनंतर पीठ थोडे घट्ट वाटल्यास पुन्हा एखादा चमचा पाणी घालून मऊ करून घ्या. आता एका सुती ओल्या कपड्यावर किंवा प्लास्टिक पेपरवर थोडं तेल लावून पिठाचा गोळा ठेवा आणि हाताने गोलाकार थापून घ्या. थालीपीठाच्या मधोमध बोटाने लहान छिद्रे पाडा, जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जाईल.
नॉन-स्टिक तवा किंवा लोखंडी तवा गरम करा. त्यावर थोडे तेल सोडा. थापलेले थालीपीठ सावधपणे तव्यावर टाका. छिद्रांमध्ये आणि कडेने थोडे तेल सोडा.
तव्यावर झाकण ठेवून २-३ मिनिटे मध्यम आचेवर थालीपीठ वाफवून घ्या. एका बाजूने छान सोनेरी रंग आला की थालीपीठ उलटून दुसऱ्या बाजूनेही खमंग भाजून घ्या.
खास टिप्स:
दह्याचा वापर: दही वापरल्यामुळे थालीपीठ बराच वेळ मऊ राहते आणि चवही छान लागते.
जाड रवा: जर तुम्ही जाड रवा वापरत असाल, तर पीठ किमान २० मिनिटे भिजत ठेवा.
चव वाढवण्यासाठी: तुम्ही यात चिमूटभर साखर किंवा जिरेपूड देखील घालू शकता.
वाढण्याची पद्धत: हे गरमागरम रव्याचे थालीपीठ लोणचे, शेंगदाणा चटणी किंवा दह्यासोबत अतिशय चविष्ट लागते.
