'पराठा' आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. पराठा म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा आलू पराठा आपल्या डोळ्यांसमोर येतो. अनेकदा आपण सकाळच्या नाश्त्याला आलू पराठा कारण्याचा बेत आखतो. आलू पराठा करायचा म्हटलं की, त्यासाठी बटाटे उकडवून त्याचे आधी स्टफिंग तयार करा मग कणिक मळून पराठ्यांसाठीचे पीठ भिजवून घ्या, अशी फार मोठी आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. यातही, मग कणकेचे गोळे करून तयात बटाटाचे सारण (Liquid Aloo Paratha Recipe) भरुन तो पराठा लाटा, लाटताना पराठा अनेकदा फाटून सारण बाहेर येत, काहीवेळा पराठा जाड असल्यामुळे भाजला देखील जात नाही, कच्चा राहतो. असा खूप मोठा घाट घालावा लागतो, परंतु सकाळच्या घाई - गडबडीत इतके सगळे किचकट आणि वेळखाऊ काम करायला फारसा वेळ नसतो(How To Make Liquid Aloo Paratha At Home).
ऑफिसची घाईगडबड - टिफिनची तयारी यात वेळ जातोच, अशावेळी झटपट आणि इन्स्टंट तयार करता येईल अशी आलू पराठ्याची इन्स्टंट रेसिपी हवी असते. यासाठी झटपट, फारशी मेहेनत न घेता आलू पराठा कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात. न कणिक मळता, न लाटता, सारण न भरता देखील तितकाच चविष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या लिक्विड आलू पराठ्याची सोपी रेसिपी...
साहित्य :-
१. बटाटे - २ ते ३ (उकडवून किसून घेतलेले)
२. कांदा - २ कप (बारीक चिरलेला कांदा)
३. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली कोथिंबीर)
४. हळद - १/२ टेबलस्पून
५. हिंग - चिमूटभर
६. गरम मसाला - १/२ टेबलस्पून
७. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार
८. गव्हाचे पीठ - १ कप
९. पाणी - गरजेनुसार
१०. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यांतआधी बटाटे उकडवून ते किसणीवर बारीक किसून घ्यावेत. या किसलेल्या बटाट्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूंन सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे.
२. आता या मिश्रणात हळद, चिमूटभर हिंग, गरम मसाला, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ घालावे.
मुलांना पिझ्झा आवडतो ना, करा हट्ट पूर्ण! पाहा पौष्टिक ओट्स पिझ्झा - खाऊ द्या पोटभर...
सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...
३. एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून मध्यम कंन्सिस्टंसीचे बॅटर तयार करून घ्यावे. या तयार बॅटरमध्ये बटाट्याचे तयार करून घेतलेले सारण घालावे. आता सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे.
४. पॅन व्यवस्थित गरम करून पॅनला तेल लावून त्यावर हे तयार बॅटर गोलाकार आकारात डोशाप्रमाणेच ओतून पसरवून घ्यावे.
५. तेल सोडून दोन्ही बाजूने हा पराठा खरपूस भाजून घ्यावा.
न कणिक मळता, न लाटता, सारण न भरता देखील तितकाच चविष्ट आणि झटपट तयार होणारा लिक्विड आलू पराठा खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम लिक्विड आलू पराठा सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.