lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > लाडू बिघडतो, करंज्या फसतात? फराळ करताना फक्त 10 गोष्टी लक्षात ठेवा, करंजी खुसखुशीत-लाडू सुंदर होणारच!

लाडू बिघडतो, करंज्या फसतात? फराळ करताना फक्त 10 गोष्टी लक्षात ठेवा, करंजी खुसखुशीत-लाडू सुंदर होणारच!

दिवाळीत फराळ त्यातही लाडू-करंजी चांगली झाली आणि सगळ्यांनी ती मनसोक्त खाल्ली तरच दिवाळी चांगली झाली असे महिलांना वाटते, मग ऐनवेळी हे पदार्थचुकू नयेत म्हणून खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 03:51 PM2021-10-23T15:51:03+5:302021-10-23T16:16:39+5:30

दिवाळीत फराळ त्यातही लाडू-करंजी चांगली झाली आणि सगळ्यांनी ती मनसोक्त खाल्ली तरच दिवाळी चांगली झाली असे महिलांना वाटते, मग ऐनवेळी हे पदार्थचुकू नयेत म्हणून खास टिप्स

Laddu goes bad, Karanjya falls? Just 10 things to keep in mind while doing faral, karanji crispy-laddu will be beautiful! | लाडू बिघडतो, करंज्या फसतात? फराळ करताना फक्त 10 गोष्टी लक्षात ठेवा, करंजी खुसखुशीत-लाडू सुंदर होणारच!

लाडू बिघडतो, करंज्या फसतात? फराळ करताना फक्त 10 गोष्टी लक्षात ठेवा, करंजी खुसखुशीत-लाडू सुंदर होणारच!

Highlightsलाडू, करंज्या चुकू नयेत म्हणून खास टिप्स...दिवाळीचा फराळ फसू नये म्हणून काय कराल...

दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो तो फराळ. फराळाच्या पदार्थांनी भरलेलं ताट नुसतं पाहिलं तरी मन भरल्यासारखं होते. घरातील महिला कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे फराळाचे पदार्थ करण्यात बिझी होऊन जाते. यात रवा-नारळाचे लाडू, शंकरपाळे, करंज्या आणि कुरुमकुरुम खाण्यासाठी चकली, चिवडा, कडबोळी असे एकाहून एक पदार्थ केले जातात. स्त्री मनापासून जीव ओतून हे पदार्थ करत असली तरी कधी काहीतरी बिनसते आणि इतके जिन्नस वापरुन कष्टाने केलेला पदार्थ फसतो. मग घरातील सगळे, नातेवाईक काय म्हणतील आणि आता फसलेल्या पदार्थाचे करायचे काय असा प्रश्न बाईला सतावतो. असे होऊ नये म्हणून काही सोप्या गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात. 

ला़डू आणि करंज्या हे तर दिवाळीच्या पदार्थांमधील सर्वात महत्त्वाचे पदार्थ. गोडाचे म्हणून विशेष मान असलेले हे पदार्थ अनेकदा सुरुवातीला केले जातात. यातही प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे रव्याचे, रवा-बेसनाचे, बेसनाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात. करंज्यांमध्येही सारणाच्या, ओल्या नारळाच्या, साटं लावून अशा एकाहून एक पद्धतीने करंज्या केल्या जातात. लक्ष्मीपूजन, पाडवा यादिवशी देवासमोर नैवेद्य दाखवायला आणि भाऊबीजेला भाऊरायाचे तोंड गोड करण्यासाठी लाडू, करंजीचे विशेष महत्त्व असते. हेच लाडू आणि करंजी फसू नयेत आणि परफेक्ट व्हावेत यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया...

( Image : Google)
( Image : Google)

१. करंजीच्या कडा अनेकदा तेलात फुटतात. त्यामुळे आतले सारण तेलात पसरते आणि तेलही खराब होते. असे होऊ नये म्हणून त्या कडांना कापसाच्या बोळ्याने दूध लावावे. 

२. करंजी करताना मोहन शक्यतो चांगल्या तुपाचे घालावे. चांगले तूप नसेल तर तेलाचे मोहनही चालते. मोहन थंड झाल्यावर पीठाला चांगले मळून घ्यावे. 

३. करंज्याचे पीठ नीरशा दुधात तिंबावे. अर्ध्या तासाने लगेचच करंज्या करायला घ्याव्यात. यामुळे करंज्या अतिशय सुंदर खुसखुशीत होतात.

४. साटं लावून करंज्या करणार असाल तर साटं करताना त्यात तेल आणि तूप सम प्रमाणात घालावे. 

( Image : Google)
( Image : Google)

५. करंजीच्या वरच्या आवरणासाठी भिजवलेले पीठ शेवटपर्यंत मऊ राहावे यासाठी पीठ भिजवल्यानंतर सुती कपडा ओला करुन तो त्याभोवती गुंडाळून ठेवा.

६. रव्याच्या लाडूसाठी रवा भाजल्यावर खाली उतरवून त्यावर चार चमचे दूध शिंपडावे. रवा छान फुलतो. लाडूला छान चव येते.

७. रवा लाडू उत्तम होण्यासाठी पाक झाल्यावर त्यात मिल्क पावडर घालावी मग भाजलेला रवा घालावा. यामुळे लाडू तोंडात विरघळेल इतका मऊ होतो. 

८. बेसनाचे लाडू चांगले होण्यासाठी बेसन खमंग भाजून घेतल्यावर त्यावर एक वाटीला एक चमचा दूध या प्रमाणाने दूध शिंपडावे. लाडूला छान खमंग चव येते.

९. बेसनाचे लाडू करताना बेसन भाजून घेतल्यानंतर ते कोमट असताना एका वाटीला एक चमचा या प्रमाणात मिल्क पावडर घातल्यास लाडू अतिशय सुरेख होतात.

१०. बेसनाच्या लाडूला तूप योग्य प्रमाणात घ्यावे. अन्यथा लाडू खूप सैल होतात नाहीतर जास्त कडक होतात.

Web Title: Laddu goes bad, Karanjya falls? Just 10 things to keep in mind while doing faral, karanji crispy-laddu will be beautiful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.