कोजागरी पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची खास परंपरा आहे. थंडगार चांदण्यात एकत्र येऊन गरमागरम दूध पिताना तयार होणारा आनंदाचा माहोल काही औरच असतो. मसाला दुधातील केशर, वेलची व बदाम यामुळे त्याला खास सुगंध आणि चव येते. थोडीशी गोडसर चव असतेच तसेच गरम दुधामुळे अंगात उब तयार होते. थंडीच्या दिवसांत असे दूध पिणे मनाला प्रसन्न करते. (Kojagari Special : see how to make perfect masala for kojagari night, easy masala milk recipe )कुटुंब तसेच मित्र परिवारासोबत बसून प्यायलेले हे दूध सणाचा गोडवा वाढवते. त्यामुळे कोजागरी म्हणजे फक्त पौर्णिमा नव्हे तर एकत्रित आनंद आणि मसाला दुधाचा खास अनुभव आहे. कोजागरीच्या दुधाचा स्पेशल मसाला बाजारात विकत मिळतो मात्र घरीच तयार करणे सोपे आणि जास्त चविष्ट ठरेल. अगदी सोपी पद्धत आहे. पाहा पारंपरिक मसाला कसा तयार करायचा.
साहित्य
काजू, बदाम, पिस्ता, जायफळ, वेलची, लवंग, केसर(नसले तरी चालते), दूध, साखर
कृती
१. वाटीभर काजू घ्या. तसेच वाटीभर बदाम घ्या. अर्धी वाटी पिस्ता घ्या. तव्यावर किंवा पॅनमध्ये बदाम, काजू, पिस्ता छान भाजून घ्यायचे. पाच मिनिटे तरू भाजायचे. नंतर त्यात थोडी वेलची घालायची आणि लवंगही घालायची. ते ही मस्त भाजून घ्यायचे. मिश्रण गार करत ठेवायचे.
२. गार झाल्यावर वाटून घ्यायचे आणि त्याची पूड तयार करायची. त्यात थोडे केसर घालायचे तसेच जायफळ किसायचे आणि घालायचे. अगदी चमचाभर जायफळ पूड घालायची. पूड छान मिक्स करायची. दुधाचा मसाला करायला अगदीच सोपा आहे.
३. एका पातेल्यात दूध गरम करत ठेवायचे. त्याला जरा उकळी आली की त्यात साखर घालायची. तसेच त्यात तयार केलेली पूड घालायची. एक लिटर दूधासाठी किमान एक वाटी पूड हवी. जास्तही चालेल. दूध आटवायचे. जास्त घट्ट करु नका, मात्र थोडे आटवून घ्या. त्याला जरा पिवळसर रंग येतो. मसाला दुधात पूर्णपणे एकजीव झाल्यावर गरमागरम दूध प्यायला घ्या. वरतून काजू, बदामाचे तुकडे घातले तरी छान लागतात.