भक्ती पाळंदे (आहारतज्ज्ञ)
पावसाळा सुरू होतो. शाळाही सुरू होतात. मुलांचे डबे हा महत्त्वाचा विषय. त्यात मुलं याकाळात आजारीही पडतात. सर्दी-खोकला-ताप अनेकांना त्रास देतो. काही मुलांना अपचन होतं तर कुणाचा कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढतो. काही मुलं जेवतच नाही. शाळेत दिलेले डबेही तसेच परत येतात. मुलं म्हणतात भूकच नव्हती. मग प्रश्न पडतो की मुलांच्या आहाराचं करायचं काय? त्यात पावसाळ्यात सतत आजारी पडून मुलांचं वजन कमी होतं, चिडचिडेही होतात. तब्येतही छान राहील आणि त्यांना आवडेलही असं काय आहारात असावं?
मुलांना काय द्यावं? काय नको?
१. खरंतर पावसाळ्यात गरम, पचायला हलका आहारच मुलांना (आणि मोठ्यांनाही) देणं योग्य. पण शाळेत गरम डबे देणं शक्य नसतं. त्यामुळे मुलं घरी असतील तेव्हाच गरम अन्न. शाळेच्या डब्याचा वेगळा विचार करायला हवा.
२. पनीर-चीज मुलांना आवडत असले तरी ते वारंवार डब्यात देऊ नयेत. त्याऐवजी डब्यात थोडे चणे-फुटाणे आठवणीने द्यावेत. गूळ-चटे हा चांगला पर्याय.
डार्क सर्कल्स वाढल्याने डोळे खोल गेल्यासारखे दिसतात? करा बटाट्याचा ‘हा’ उपाय- काळी वर्तुळं गायब
३. सर्व प्रकारच्या लाह्यांचा चिवडा जरूर द्याव्या. फक्त पॉपकॉर्नच देतो असे नाही तर साळीच्या, ज्वारीच्या, राजगिरा लाह्या याचा चिवडा द्या.
४. कधीतरी उसळही चालेल, पण पोट बिघडत असेल, पचत नसेल तर डब्यात उसळ देऊ नका.
५. पालेभाज्या सोडून बाकी सर्व भाज्या, त्यांचे पराठे, मुटके असेही डब्यात देता येईल.
६. मुलांना शाळेत दूध पिऊन जायची सवय असेल तर दूध कोमट हवे, त्यात थोडी सुंठ पावडर आठवणीने घाला.
७. दुधाऐवजी मनुका, बदाम, अंजीर असे रात्री भिजवून सकाळी खाणे जास्त चांगले.
घरकाम करून हात खरखरीत झाले- काळवंडून गेले? फक्त १० मिनिटांचा उपाय- हात होतील मऊ
८. सुकामेवा, फुटाण्यांचे लाडू, गूळपापडीचे लाडू मधल्यावेळात खाण्यासाठी उत्तम.
९. मुलांना सुट्टीत खेळायचं असतं म्हणून ते डबा भरभर खातात हे लक्षात ठेवून पौष्टिक पदार्थ केले, पचायला हलके असले तर जास्त चांगलं.
१०. मुलांनी चारीठाव जेवायला हवं हे खरं, मात्र शाळेचा डबा त्यांच्यासाठीही आनंदाचा करायचा आपला प्रयत्न हवा.