जिलेबी नावडणारे तसे दुर्मिळच! मायग्रेन सारख्या आजारात तर सकाळी अंशपोटी जिलेबी खाण्याचा उपायही कुठेतरी वाचल्याचे आठवते. पण सणासुदीला भरपूर विकली जाणारी बजेट फ्रेंडली जिलेबी घरच्या साहित्यात १० मिनिटात तयार होणार असेल तर? खोटं वाटतं? साहित्य आणि रेसेपी पहा आणि सोबत खास टीप लक्षात ठेवा आणि रसरशीत जिलेबीचा फडशा पाडा.
साहित्य :
मैदा - २०० ग्रॅम
कॉर्नफ्लोर - ४० ग्रॅम
दही (दही) - १०० ग्रॅम
बेकिंग पावडर - १० ग्रॅम
पाणी - १०० मिली
पिवळा/केशरी खाद्यरंग चिमूटभर
पाकासाठी
साखर - ५०० ग्रॅम
पाणी - २५० मिली
हिरवी वेलची
लिंबाचा तुकडा - १
तळण्यासाठी तेल/तूप
कृती
सर्वप्रथम पाकाची तयारी :
>> एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. साखर विरघळल्यानंतर पाक मंद आचेवर उकळू द्या.
>> पाक एकतारी (बोटांना चिकट) होईपर्यंत उकळवा. जास्त घट्ट नसावा. गॅस बंद करून त्यात वेलची पूड आणि रंग घाला.
>> पाक तयार झाल्यावर बाजूला ठेवून द्या. जिलबी तळून होईपर्यंत कोमट होऊ द्यावा.
जिलेबीचे इन्स्टंट बॅटर करण्यासाठी :
>> एका मोठ्या भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोर, बेकिंग पावडर, दही आणि खाद्यरंग एकत्र करा. गुठळ्या न राहता मिश्रण चांगले फेटून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला.
>> कॉर्नफ्लोर, बेकिंग पावडर हे जिलेबी कुरकुरीत होण्यासाठी खास साहित्य आहे आणि हीच सीक्रेट टीप सुद्धा आहे.
>> बॅटर जास्त पातळ किंवा घट्ट नसावे (ते सॉसच्या बाटलीतून सहज ओतता आले पाहिजे)
>> जिलेबी मिश्रण साच्यात किंवा रुमालात भरून छिद्र पाडण्याआधी त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालून एकाच दिशेने मिश्रण जलद गतीने (फक्त ३० सेकंद) हलवा. इनो घातल्यानंतर लगेचच तळायला सुरुवात करावी.
>> एका कढईत तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करा.
>> बॅटर जिलेबीच्या कपड्यात किंवा सॉस बॉटलमध्ये भरा.
>> गरम तेलात गोलाकार फिरवत जिलबीचा आकार द्या. जिलबी मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
>> तळलेली जिलबी गरम असतानाच कोमट पाकात २० ते ३० सेकंद बुडवून लगेच बाहेर काढा.
>> गरमागरम कुरकुरीत जिलबी लगेच सर्व्ह करा!