Join us

स्वयंपाकासाठी - पदार्थ तळण्यासाठी सनफ्लॉवर ऑइल चांगलं असतं का? वाचा फायदे आणि त्रासही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 14:22 IST

Sunflower oil Good or Bad for Cooking: सनफ्लॉवर तेल म्हणजे सूर्यफुलांच्या बियांचं तेल. गेल्या काही वर्षात हे तेल अधिक खाल्लं जात आहे. पण हे तेल खरंच स्वयंपाकासाठी चांगलं असतं का?

Sunflower oil Good or Bad for Cooking: तेलाचा वापर केल्याशिवाय काही पदार्थ खाणं भारतीय लोकांच्या विचारातही येत नाही. काही तळायचे असेल, भाजी करायची असेल, चपाती लाटायची असेल सगळ्याच गोष्टींसाठी तेल वापरलं जातं. लोक स्वयंपाकासाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या तेलाचा वापर करतात. यातील एक तेल म्हणजे सनफ्लॉवर तेल म्हणजे सूर्यफुलाच्या बियांचं तेल. गेल्या काही वर्षात हे तेल अधिक खाल्लं जात आहे. पण हे तेल खरंच स्वयंपाकासाठी चांगलं असतं का?

दिल्लीच्या न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन पूजा सिंह यांनी Onlymyhealth ला सांगितलं की, १०० ग्रॅम सनफ्लॉवर तेलात ८८० कॅलरी, १०० ग्रॅम फॅट, १९.५ ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, ६५.७ ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि व्हिटामिन ई आढळतं. हे तेल आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. आणखी एक चांगली बाब म्हणजे या तेलात कोलेस्टेरॉल नसतं. त्यामुळे हृदयासाठी हे तेल फायदेशीर म्हणता येईल.

जेवणासाठी सनफ्लॉवर तेल फायदेशीर आहे का?

एक्सपर्ट सांगतात की, सनफ्लॉवर तेलाचा जर योग्य प्रमाणात वापर केला तर जेवण बनवण्यासाठी हे एक चांगलं तेल ठरू शकतं. पण प्रमाण संतुलित असावं. जास्त प्रमाणात हे तेल खाल तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

सनफ्लॉवर ऑइलचे फायदे

एक्सपर्ट सांगतात की, सनफ्लॉवर तेलात अधिक प्रमाणात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आढळतं. हे तेल शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

सनफ्लॉवर तेलातील अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट तत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. ज्यामुळे सर्दी-खोकला आणि इन्फेक्शनसारख्या समस्यांपासून बचाव होतो.

या तेलात भरपूर प्रमाणात व्हिटामिन ई असतं, जे त्वचेला मॉइश्चराइज करतं आणि अ‍ॅंटी-एजिंग गुण देतं. सनफ्लॉवर ऑइलमुळे त्वचा ग्लोईंग आणि सुंदर होते.

मोहरीच्या तेलाच्या तुलनेत सनफ्लॉवर ऑइल पचनास खूप हलकं असतं. त्यामुळे या तेलानं पचन तंत्रावर अधिक भार पडत नाही.

सनफ्लॉवर ऑइलमध्ये व्हिटामिन के भरपूर असतं, ज्यामुळे हाडं मजबूत होतात.

सनफ्लॉवर ऑइलचे नुकसान

- सनफ्लॉवर ऑइलमध्ये ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड भरपूर असतं. त्यामुळे हे तेल अधिक खाल्लं तर शरीरात सूज आणि जुने आजार जसे की, डायबिटीस, कॅन्सर, हृदयरोग वाढू शकतात.

- सनफ्लॉवर ऑइलमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट जास्त असतं. जर याचा वापर डीप फ्राय करण्यासाठी केला तर हे लवकर ऑक्सिडाइज होतं. ज्यामुळी फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे शरीरातील पेशींचं नुकसान करतात.

- तसेच या तेलात कॅलरी अधिक असतात. नेहमीच जर या तेलानं जेवण बनवलं तर आपलं वजन वेगानं वाढू शकतं.

कुणासाठी ठरू शकतं घातक?

तसं तर हे तेल आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. पण काही लोकांसाठी हे तेल खाणं नुकसानकारक ठरू शकतं. डायबिटीसचे रूग्ण, ओमेगा-6 सेंसिटिव लोक, अस्थमा किंवा सूजेसंबंधी आजाराने ग्रस्त लोक, हाय ब्लड प्रेशरचं औषध घेणाऱ्या लोकांनी हे तेल वापरू नये, असा सल्ला दिला जातो.

एक्सपर्ट सांगतात की, कोणत्याही तेलाचा सतत वापर करणं टाळलं पाहिजे. तेल अधून मधून बदलून वापरायला हवं. असं केल्यानं शरीरात संतुलित फॅटी अ‍ॅसिड मिळतं. त्यामुळे थोड्या थोड्या दिवसांनी तेल बदलायला हवे.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सकिचन टिप्स